स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailiv.com@gmail.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात अत्यंत उत्साहात साजरा होत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी आंतराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, तत्वज्ज्ञ, विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर ‘विज्ञानाधिष्ठित समाजाकडे’ या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधणार असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना थेट उत्तरेही देणार आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन संस्मरणीय व्हावा तसेच देशाचे भविष्य असणा-या पुढच्या पिढीला निश्चित अशी प्रगतीशील दिशा मिळावी यादृष्टीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याशी सुसंवाद अत्यंत महत्वाचा आहे. स्वातंत्र्यदिनासारखे औचित्य साधून अशा महनीय व्यक्तीच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ युवा पिढीला घडविणे व विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी विचारमंथन होणे या उद्देशातून आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविदयालये यामधील विदयार्थी, शिक्षक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच समाजातील वैज्ञानिक साक्षरता वाढून देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिशा मिळावी या दृष्टीने हा सुसंवाद विचारप्रणव जागरूक नागरिकांसाठीही अत्यंत महत्वाचा आहे.
भारतात वैज्ञानिक संस्थांचे संस्थाचे जाळे निर्माण करीत ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे तसेच देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना आकार व योग्य दिशा देणारे, पेटंटचे महत्व अधोरेखित करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मार्गदर्शक विचार प्रत्यक्ष ऐकण्यासाठी व त्यामधून प्रेरणा घेण्यासाठी सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी आणि विशेषत्वाने कुमारवयीन मुलांनी व युवकांनी या कार्यक्रमाप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.