स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailiv.com@gmail.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : आगरी कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या सणाला अतिशय आनंदात साजरा करण्यात येतो. समस्त सानपाडा ग्रामस्थांच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सव गावातून बँडची मिरवणूक काढत अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला.
गावदेवी मंदिर सानपाडा येथे नारळ पूजन करून बँड व आतिषबाजीत मिरवणूक आयोजित करण्यात आली. त्यानंतर बुद्धेश्वर मंदिरात नारळ पूजन करून वाशी स्टेशन नजीक खाडीवर हौशीराम नाखवा डोलीवर नारळ हा समुद्राला अर्पण करून समुद्र पूजन करण्यात आले. यामध्ये गावातील बालकांपासून वृद्धांनी सहभाग नोंदविला होता. छोट्यांनी पारंपारिक कोळी वेश परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले.
हा उत्सव यशस्वी करण्याकरिता नामदेव ठाकूर, मुकेश ठाकूर, नगरसेवक सोमनाथ वास्कर, मयूर ठाकुर, प्रल्हाद ठाकुर, शिवसेना विभागप्रमुख आशिष वास्कर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे रूपेश ठाकुर, भाजपाचे राजेश ठाकुर व अन्य ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. ओमक़ार कला सर्कलच्या बँड़ पथक वाद्य वादनावर ग्रामस्तांनी कोळी नृत्याचा ठेका धरला. अशाप्रकारे हा कार्यक्रम आयोजित करून पुढेही नवीन पिढीला आपली परंपरा जपण्याचा संदेश ग्रामस्थांनी दिला.