सूर्यकांत आसबे : Navimumbailiv.com@gmail.com : ९८२००९६५७३
सोलापूर : भीमा खोऱ्यात आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरण शुक्रवारी सकाळी ९ वाजता १०० टक्के भरले. उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सुमारे १० हजार तर वीज निर्मितीसाठी १६०० क्युसेक असा एकूण ११६२ क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे .भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे .पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पंढरपूरचा जुना दगडी पुल सायंकाळी पाण्याखाली गेला .त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली असून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नीरा नदीवरील वीर धरणसुद्धा भरल्यामुळे या धरणातूनसुद्धा सोडण्यात येणारे पाणी गुरुवारी सायंकाळी ३२ हजार ५०० क्युसेक इतके वाढविण्यात आल्यामुळे निरा व भीमाकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे घोड ,चासकमान, खडकवासला यासह अन्य काही धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरण झपाट्याने वधारले असून धरण १२३ टीएमसीच्या दिशेने वाटचाल करत आहे. उपयुक्त पाण्याचा साठासुद्धा वाढला आहे. उजनी धरणामधून कालव्यामध्ये १५०० क्युसेक तर सीना भीमा जोड कालव्यात ८०० क्युसेक यासह दहिगाव प्रकल्पात ४३ क्युसेक पाणी सोडले जात आहे.
उजनी धरणात पहिल्यांदा १९८० सालात पाणी अडविण्यात आले. धरणाचा परिसर २९ हजार हेक्टर क्षेत्राचा आहे .डाव्या कालव्याची लांबी २५० किलोमीटर आहे .तर उजनीतून भिजणारे शेतीचे क्षेत्र १ लाख ९७ हजार हेक्टर इतके आहे. उजनी धरणावर एकूण ११ सिंचन योजना असून या सिंचन योजनांसाठी ८४.३४ टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. उजनी धरण १२3 टीएमसीचे आहे.