नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील रहीवाशांसाठी तसेच सारसोळे आणि कुकशेतच्या ग्रामस्थांसाठी ओला व सुका कचरा संकलनासाठी गृहनिर्माण सोसायट्यांना तातडीने डब्बे वितरीत करण्याची मागणी नवी मुंबई महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव व कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे.महापालिका प्रशासनाकडून सध्या ओला व सुका कचरा वर्गीकरण झाल्यानंतरच कचरा संकलनाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. कचरा वर्गीकरण नसल्यास महापालिका प्रशासनाचे कचरा वाहतूकदार कचरा घेवून जात नाहीत. ओला व सुका कचरा वर्गीकरण ही प्रशासनाची भूमिका स्तुत्य आहे. परंतु अंमलबजावणीस व वर्गीकरण नसलेला कचरा न उचलण्याच्या भूमिकेस महापालिका प्रशासनाकडून घाई करण्यात आलेली आहे. महापालिका प्रशासनाकडून गृहनिर्माण सोसायट्यांना गेल्या पाच वर्षात कचरा कुंड्यांचे वितरण करण्यात आलेले नाही. जुन्या कचराकुंड्या तुटल्या आहेत. त्यातून सुका कचराच गळत आहे तर ओला कचरा त्यात कसा जमा होणार? प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव व कुकशेत गावमधील रहीवाशांच्या व ग्रामस्थांच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कचरा संकलनासाठी सर्वप्रथम तातडीने महापालिका प्रशासनाने कचराकुंड्या उपलब्ध करून द्याव्यात व त्यानंतरच ओला व सुका कचरा वर्गीकरणाची सक्ती करावी. एकीकडे महापालिका प्रशासनाकडून करदात्या नवी मुंबईकर रहीवाशांना कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत आणि दुसरीकडे ओला व सुका कचरा वर्गीकरणाची सक्ती लादली जात आहे. कचरा उचलला न गेल्यास रहीवाशांमध्ये संतापाचा स्फोट होवू शकतो. गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात दिसणारे कचऱ्याचे ढिगारे रस्त्यावर दिसू लागतील आणि त्यामुळे स्वच्छ व सुंदर नवी मुंबईचे कचऱ्याच्या दुर्गंधीची नवी मुंबई असे रूपांतर होण्यास फारसा वेळ लागणार नाही. समस्येचे गांभीर्य पाहता पालिका प्रशासनाने प्रथम नेरूळ प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव व कुकशेत गावमधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या रहीवाशांना तसेच ग्रामस्थांच्या घरांना व इमारतींना ओला व सुका कचरा संकलनासाठी लवकरात लवकर डब्बे उपलब्ध करून आणि त्यानंतर कचरा वर्गीकरणाची सक्ती करावी अशी मागणी सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.