नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २४ मधील उद्यानामध्ये स्वच्छता अभियान राबविण्याची लेखी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर २४ मध्ये महापालिका प्रशासनाचे उद्यान आहे. या उद्यानात सध्या जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. या उद्यानात ठिकठिकाणी कचराही दिसून येत आहे. उद्यानात पूर्णपणे स्वच्छतेचा अभाव असून बकालपणा वाढला आहे. दुर्गंधीही वाढीस लागली आहे. याच ठिकाणी स्थानिक रहीवाशांकडून सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रउत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेला आहे. या उद्यानात स्वच्छता अभियान लवकरात लवकर राबवून कचऱ्याचे ढिगारे हटविणे, जंगली गवत काढून टाकण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.