नवी मुंबई : महापालिका प्रशासनाची परवानगी नसतानाही महापालिकेला न जुमानत उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत टॉवरच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्यासह स्थानिक रहीवाशी नेरूळ सेक्टर १० येथील रस्त्यावर उतरले. टॉवरमुळे स्थानिक रहीवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाल्याने रस्त्यावर उतरून रहीवाशांनी नगरसेविका सौ. सुनिता मांडवे यांच्यासह घोषणा देत निदर्शने केली. अनधिकृत टॉवरविरोधात वातावरण चिघळले असून महापालिकेला न जुमानता टॉवर उभारल्याने महापालिकेला कोणी जुमानत नसल्याचे रहीवाशांमध्ये बोलले जात आहे.
साईबाबा हॉटेलवर टॉवर उभारणी करण्यात येत असून याविरोधात स्थानिक रहीवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. साईबाबा हॉटेलनजिक असलेल्या वृंदावन, अरूणोदय, शिवनेरी, इंद्रप्रस्थ, साई कॉर्नर या गृहनिर्माण सोसायटीतील सुमारे अडीच हजार रहिवाशांच्या जिवितांवर टांगती तलवार निर्माण झालेली आहे. महापालिका नेरूळ विभाग अधिकारी व अतिक्रमण विभागाचे अधिकारी स्थानिक महिला निदर्शन करत असलेल्या ठिकाणी आले व या टॉवर उभारणीप्रकरणी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्यासह स्थानिक रहीवाशी, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. स्थानिक रहीवाशांच्या आरोग्याला या मोबाईल टॉवरमुळे धोका निर्माण झाला असून हा टॉवर हटविल्याशिवाय आपण माघार घेणार नसल्याचा इशारा शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी यावेळी दिला.