संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारालगत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियन या कामगार संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन बुधवारी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही कामगार संघटना इंटक संलग्न असून गेल्या काही वर्षात कामगारांच्या प्रशासन दरबारी समस्या सोडविणे व कामगारांना सुविधा मिळवून देणे याबाबत महाराष्ट्र कर्मचारी युनियने उल्लेखनीय कार्य केल्याने महापालिका कामगार वर्तुळात ही कामगार संघटना अल्पावधीतच नावारुपाला आलेली आहे. कंत्राटी कामगार, ठोक मानधनावरील कामगार, कायम सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा व भेडसावणाऱ्या असुविधांचा महाराष्ट्र कर्मचारी युनियनने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अधिकांश समस्या सोडविण्यात यश मिळविले आहे. कामगारांची पदोन्नती, कोव्हिड काळातील भत्ता, विलंबाने होणारे वेतन, ठेकेदारांकडून होणारी कामगारांची पिळवणूक, वेतन वाढ, वैद्यकीय विभाग, वाहन चालक, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या असुविधा, मयत कामगारांच्या वारसांना नोकरी, आरोग्य सुविधा, पीएफसंबंधातील प्रश्न यासह असंख्य समस्यांचे निवारण महाराष्ट्र कर्मचारी युनियनने कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली केले आहे. यासह महापालिका आरोग्य विभागातही आपल्या कामातून युनियनने वेगळा ठसा अल्पावधीत उमटवलेला आहे. रविकुमार सोमवंशी हे कामगार बरेच दिवस आजारपणामुळे घरीच बसून आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने संघटनेच्या माध्यमातून १५०० हजाराचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला.
घणसोली, आसूडगाव, तुर्भ्र डेपोतील असुविधा व समस्यांचे निवारण करताना परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या व असुविधा यावरही प्रशासनदरबारी सातत्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियनने लेखी निवेदनातून तसेच आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांशी शिष्टमंडळासमवेत भेटून परिवहनच्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. कामगारांच्या आग्रहास्तव परिवहन उपक्रमाच्या तुर्भे डेपोच्या प्रवेशद्वारानजिक महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा नामफलक उभारण्यात आला असून बुधवारी दुपारी १ वाजता कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे सचिव मंगेश गायकवाड़, युनिट अध्यक्ष नितिन गायकवाड, उपाध्यक्ष कांतिलाल चांदणे, प्रकाश भोईर, बसवराज पाथरवट, प्रवर्तक अशोक बिराजदार, जितेश तांडेल, मसूरे यांच्यासह मोठ्या संख्येने परिवहनचे अधिकारी व कर्मचारी तसेच युनियनचे सदस्य यावेळी उपस्थित होते.