नवी मुंबई : १५ जुलैपासून केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोव्हीड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाला सुरुवात करण्यात आलेली असून या अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत १८ ते ५९ वर्षे वयाच्या ६६५४६ नागरिकांनी कोव्हीडचा तिसरा अर्थात प्रिकॉशन डोसचा लाभ घेतलेला आहे. १८ वर्षावरील नागरिकांना कोव्हीड लसीच्या पहिल्या व आणि दुसऱ्या डोसचे १०० टक्के उद्दीष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वप्रथम पूर्ण केले. त्याच धर्तीवर तिसरा अर्थात प्रिकॉशन डोस देण्याचीही कार्यवाही करण्यात येत आहे.
आता कोव्हीड १९ लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिने किंवा २६ आठवड्यांनी प्रिकॉशन डोस घेता येत असून १ लाख ७४ हजार १४१ आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी प्रिकॉशन डोसचा लाभ घेतला आहे. प्रिकॉशन डोस घेऊन नागरिकांनी लस संरक्षित व्हावे याकरिता नागरी आरोग्य केंद्रांमार्फत स्थानिक परिसरात विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. लस घेतलेल्या नागरिकांना कोव्हीडची लागण झाली तरी आजाराची तीव्रता मर्यादित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील आठवड्याभरापासून कोव्हीड बाधीतांच्या सख्येत काहीशी वाढ झालेली दिसत असून आगामी गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी लवकरात लवकर प्रिकॉशन डोस घेऊन लस संरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आत्तापर्यंत १३,८५,५८५ नागरिकांनी कोव्हीडचा पहिला डोस घेतला असून १२,४३,६६२ नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे १,७४,१४१ नागरिकांनी प्रिकॉशन डोसचा लाभ घेतला आहे. यामध्ये लहान मुलांच्या लसीकरणाकडेही विशेष लक्ष दिलेले असून १५ ते १८ वयोगटातील पहिल्या डोसचे १०० टक्के उद्दीष्ट नवी मुंबई महापालिकेनेच पहिल्यांदा पूर्ण केलेले आहे. आत्तापर्यंत ८२,२८९ मुलांना पहिला डोस दिलेला असून ६७,११७ मुलांना दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. दुसऱ्या डोसचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी शाळा व महाविद्यालयीन पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत.
अशाचप्रकारे १२ ते १४ वयोगटातील ४६,९२३ मुलांना पहिला डोस देण्यात आलेला असून याचेही ९९ टक्के उद्दीष्ट पूर्ण झालेले आहे. यामधील ३६,७२४ मुलांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. पहिल्या डोसचे १०० टक्के उद्दीष्ट येत्या काही दिवसातच पूर्ण करण्याचे नियोजन नजरेसमोर ठेवून कार्यवाही सुरु आहे.
प्रिकॉशन डोस घेण्यात नागरिकांना सुलभता व्हावी यादृष्टीने मागणीनुसार सोसायट्यांची कार्यालये, खाजगी रुग्णालये, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अशा ठिकाणी अतिरिक्त लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोर्बिव्हॅक्स ही लस प्रिकॉशन डोस म्हणून घेता येईल. कोर्बिव्हॅक्स या लसीला विषम कोव्हीड १९ बुस्टर लस म्हणून मान्यता मिळाली असून ज्या १८ वर्षावरील नागरिकांनी यापूर्वी कोव्हीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले असतील ते नागरिक ६ महिने किवा २६ आठवडयानंतर कोर्बिव्हॅक्स लस प्रिकॉशन डोस म्हणून घेऊ शकतात. कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत साजरा केला जात असून ३१ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या श्रीगणेशोत्सव कालावधीतही नागरिकांना प्रिकॉशन डोस घेता यावा अशी सुविधा महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी सुरु ठेवण्यात आलेली आहेत. तरी १८ ते ५९ वयोगटातील अथवा त्यापुढील वयाच्या नागरिकांनी आपला प्रिकॉशन डोस विनामूल्य घेऊन स्वत:ला लस संरक्षित करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.