नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये रहीवाशी मुषकांच्या उद्रेकाने त्रस्त झाले असून महापालिका प्रशासनाने या प्रभागामध्ये मूषक नियत्रंण अभियान राबविण्याची मागणी भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात उंदरांचा उद्रेक वाढीस लागल्याने स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. मूषकाच्या उद्रेकावर नियत्रंण न मिळविल्यास पावसामुळे लेप्टोस्पायरोसिस होण्याची भीती आहे. प्रभाग ३० मधील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारामध्ये व बाहेरील भागात मूषक नियत्रंण अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देवून सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.