संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नांदेड (प्रतिनिधी) : कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. ही पदयात्रा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेदरम्यान पुढील १४ दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे खा. राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
हजारो मशाल हाती घेऊन राहुल गांधी यांच्यासह भारतयात्री सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला. तेलंगणातून महाराष्ट्रात पदयात्रा येताच तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी तिरंगा झेंडा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हाती सोपवला. यावेळी राहुल गांधी यांचे मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करण्यात आले.
राहुल गांधी देगलूर येथे जमलेल्या हजारो जनसमुदाला संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देऊन केली. राहुल गांधी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून करत आहे ही अभिमानाची बाब आहे. देशात आज ज्वलंत समस्या आहेत पण केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही, केवळ चार पाच भांडवलदारांसाठी हे सरकार काम करत आहे. नोटबंदीने देशातील छोटे व्यवसाय डबघाईला आले. ४०० रुपयांचा गॅस सिलेंडर ११०० रुपये झाला, पेट्रोल, डिझेल १०० रुपये लिटर झाला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक चकार शब्दही बोलत नाहीत.
देगलूर येथील कार्यक्रमात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंग, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री सुनिल केदार, माजी राज्यमंत्री बंटी पाटील, डॉ. विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, खा. रजनी पाटील, कुमार केतकर, माजी खासदार हुसेन दलवाई, मा. खासदार संजय निरुपम, शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे, आ. अमर राजूरकर, आ. वजाहत मिर्झा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, डाॅ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, सचिन सावंत, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आशिष दुआ, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.
राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तेलंगणातील कामीरेड्डी येथून आलेल्या पदयात्रेचे देगलूरमध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. नांदेड परिसरातील सर्व रस्त्यांवरून लोक देगलूरकडे राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जात होते.
देगलूर येथून राहुल गांधी गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी, वन्नाळी कडे पायी निघाले यावेळी जवळपास चार हजार मशालींसह हजारो भारतयात्री ही पदयात्रेने वन्नाळीपर्यंत गेले. यात्रेचा आजचा मुक्काम देगलूर येथे असेल.