नवी मुंबई : मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या वेतनाची दिनांक निश्चित करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व कामगार नेते संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात मुषक नियत्रंक कर्मचारी हा गेल्या काही वर्षापासून प्रशासनाच्या दरबारी व राजकारण्यांच्या लेखी शापित घटकच राहीला आहे. ठेकेदारांकडून गेली अनेक वर्षे वेतनास विलंब होत असतानाही प्रशासनाने मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास उदासिनताच दाखवित ठेकेदाराचीच पाठराखण केलेली आहे. महापालिका प्रशासनातील आस्थापनेवर असणाऱ्या कायम संवर्गातील कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन ठराविक तारखेलाच होते. इतकेच नाही तर कंत्राटी, रोजदांरी तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे वेतनही ठराविक तारखेलाच होते. मग मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतन ठराविक तारखेला आणि वेळेवर का होत नाही, या एकच प्रश्नांचे उत्तर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने वारंवार लेखी मागणी करुनही आजतागायत दिलेले नसल्याचे कामगार नेते संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
नवी मुंबई महापालिका राज्यात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जात आहे. अडीच हजार कोटींच्या ठेवी या महापालिकेच्या आहेत. या महापालिकेकडे मोरबेसारखे स्वमालकीचे धरण आहे. राज्य व केंद्र दरबारी या महापालिकेला सातत्याने पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. पण जर मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे वेतनप्रकरणी दर महिन्याला शोषणच होणार असेल तर या अडीच हजार कोटींच्या ठेवी हव्यात कशासाठी? जर मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचा वेतनाबाबतचा गेल्या दहा-बारा वर्षातील अहवाल मागवून घेतला तर दोन-तीन कधीकधी चार महिने उशिराने वेतन झालेले आहे. सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांना महिन्याच्या ठरविक तारखेला वेतन मिळत असेल तर मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना वेतन का मिळत नाही. त्यामुळे अन्य कंत्राटी, ठोक तसेच रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांनाही महिन्याच्या एका ठराविक तारखेला वेतन देण्याचे निर्देश द्यावेत आणि यापुढे मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब झाल्यास संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करून मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व त्यांची आजवर होत असलेली आर्थिक ससेहोलपट संपुष्ठात आणावी अशी मागणी कामगार नेते संदीप खांडगेपाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.