नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४ मधील महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानात ओपन जीम सुरु करा तसेच नेरूळ सेक्टर ४ मधील पालिका उद्यानातील ओपन जीममधील तुटलेले साहित्य हटवून नवीन साहित्य बसविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
जुईनगर, सेक्टर २५ मध्ये महापालिकेचे सार्वजनिक उद्यान आहे. या उद्यानासभोवताली सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. काही प्रमाणात साडे बारा टक्के भुखंडावरील खासगी सोसायट्या आहेत. येथून काही अंतरावर गावही आहे. सध्या नवनवीन साथीचे आजार वाढीस लागले असल्याने शरीर स्वास्थ्याची काळजी घेणे काळाची गरज बनले आहे. महागाईमुळे घरातील सर्वांनाच खासगी व्यायामशाळेत जावून व्यायाम करणे खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे नवी मुंबईतील अन्य उद्यानामध्ये बसविण्यात आलेल्या ओपन जीमच्या धर्तीवर याही उद्यानात ओपन जीम लवकारात लवकर सुरू करावी, जेणेकरून स्थानिकांना सकाळच्या वेळी या उद्यानात वॉकसोबत व्यायाम करणे शक्य होईल. संबंधितांना या उद्यानात लवकरात लवकर ओपन जीम सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.
नेरूळ सेक्टर ४ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान आहे. या उद्यानातील ओपन जीमचे साहित्य बसविल्यानंतर काही दिवसातच खराब झाले आहे. संबंधित ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे साहित्य ओपन जीममध्ये बसविल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या समस्येविषयी मी आपणाकडे व शहर अभियंत्याकडे लेखी निवेदने सादर केलेली आहेत. ओपन जीममधील साहित्य नादुरुस्त झाल्याने स्थानिक रहीवाशांना व्यायाम करता येत नाही. निकृष्ठ दर्जाचे साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्यालाच लवकरात लवकर चांगल्या दर्जांचे साहित्य ओपन जीममध्ये बसविण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.