अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळमधील डीवायपाटील रुग्णालय आस्थापनेला तातडीने पार्किंग व्यवस्था बनविण्याचे निर्देश देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ पूर्वेला डीवायपाटील रुग्णालय सर्वपरिचित रुग्णालय आहे. सर्वसामान्यांपासून उच्चभ्रूपर्यंत सर्वांनाच या रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. पूर्वी या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी व रुग्णांच्या नातलगांसाठी पार्किंग व्यवस्था होती, परंतु त्या जागेवर आता संबंधितांनी बांधकाम सुरु केल्याने रुग्णालय आवारात रुग्ण तसेच त्यांच्या नातलगांसाठी कोठेही वाहन पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णालय प्रवेशद्वाराच्या समोरील रस्त्यावर कोपऱ्यामध्ये दुचाकींची पार्किग केली जात आहे. दुचाकीची वाहन पार्किंग रस्त्याच्या कोपऱ्यावर होत असून वाहतुकीला त्यामुळे अडथळाही होत नाही. रुग्ण उपचारासाठी घाईघाईत येत असल्याने त्याला प्रवेशद्वारालगत रस्त्यावर दुचाकी वाहने उभी करावी लागतात. तसेच रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यावर त्याच्यासोबत राहणाऱ्यांना तसेच त्याच्या औषधपाणी नेआण करण्यासाठी धावपळ करणाऱ्या नातलगांच्या दुचाकीही पार्किग करावी लागतात. अनेकदा रुग्ण अथवा रुग्णाच्या नातलग बाहेर आल्यावर आपली दुचाकी वाहतुक पोलिसांनी टोईग वाहन लावून उचलून नेल्याचे निदर्शनास येते. औषधासाठी धावपळ करायची, बिलाचे पैसे भरण्यासाठी पैशाची जमवाजमव करण्यासाठी धावपळ करायची का उचलून नेलेले वाहन सोडवून आणण्यासाठी धावपळ करायची यातच रुग्ण व रुग्णाच्या नातलगांना वेळ खर्ची घालावा लागत आहे. डीवायपाटील रुग्णालय हे रुग्णांना उपचार करत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातलगांच्या वाहनांसाठी पार्किग व्यवस्था उपलब्ध करुन देणे रुग्णालय व्यवस्थापणाचे कर्तव्य आहे. अत्यल्प दरात रुग्णालय व अन्य सुविधांसाठी सिडकोकडून भुखंड उपलब्ध झालेले असताना त्या जागेचा व्यावसायिक वापर करुन नफा कमविणे योग्य नाही. रुग्ण व रुग्णाच्या नातलगांसाठी वाहन पार्किंगची सोय करून सामाजिक बांधिलकी डीवायपाटील रुग्णालय व्यवस्थापणाने जोपासणे आवश्यक आहे. तरी समस्येचे गांभीर्य व रुग्ण तसेच रुग्णांच्या नातलगांना वाहन उचलून नेल्याने होणारा त्रास पाहता आपण रुग्णालय व्यवस्थापणाला तातडीने पार्किगची व्यवस्था करण्याचे निर्देश द्यावेत आणि रुग्णालय प्रवेशद्वारालगत असणारी वाहने रुग्ण व त्यांच्या नातलगांची असल्याने आणि औषधासाठी त्यांना धावपळ करावी लागत असल्याने या वाहनांबाबत काही कालावधीकरता लवचिक भूमिका घेण्याचे वाहतुक पोलिसांना निर्देश देण्याची महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.