गेल्या दोन दिवसांपासून भाजपनेत्या चित्र वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी अत्यंत तोकडे कपडे घालून उर्फी जो काही तमाशा करीत असते त्यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेऊन राज्यातील लाखो महिलांची भावना व्यक्त केली आहे. मुळात बुद्धीचा पत्ता नसलेल्या उर्फीने चित्रा वाघ यांनाच खरीखोटी सुनावत आपल्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षात उर्फीने सोशल मीडियावर शरीराचे सगळे भाग दाखवत जो काही नंगानाच सुरु केला आहे त्याचे कुणीही समर्थन करू शकणार नाही एवढे ते बीभत्स म्हटले पाहिजे. स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात असले येडे चाळे खपवून घेतले जाणार नाहीत याचीही काळजी पोलिसांच्या सामाजिक शाखेने या आधीच बजावायला हवी होती. मेरी बॉडी मेरी मर्जी हे स्वातंत्र्य खासगीत कुणालाही मान्य होईल मात्र राजरोस त्याचे प्रदर्शन मान्य होता कामा नये.
उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेली २४ वर्षीय उर्फी जावेद ही ख्यातनाम सिनेलेखक जावेद अख्तर यांची नाते असल्याचा बहुतेक माध्यमांना गैरसमज आहे. असंख्य माध्यमांनी जावेद अख्तर यांच्यावर ही कथित नात लादली आहे. रस्त्यावर अंगप्रदर्शन करीत मोकाट सुटलेल्या उर्फीचे अचाट प्रकार पाहून शेवटी जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी याना ट्विटर वरून त्याचा खुलासा करावा लागला. उर्फी जावेद आणि आमचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. उर्फीची वक्तव्ये सुद्धा तिचा बेशरमपणा भक्कम असल्याची साक्ष देणारी आहेत. तिला याबाबत विचारले असता मेरी बॉडी है, मेरे बुब्स है ,मै कैसे भी दिखाऊं किसीको क्या प्रॉब्लेम हो सकता है असे स्त्रीच्या सगळ्या मर्यादा चुलीत घालणारे उत्तर दिले आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दररोज शरीराचे प्रदर्शन करणाऱ्या उर्फीला चित्रा वाघ यांचा दणका एकदा बसण्याची गरज होती.
चित्रपट जगतात अल्पावधीत प्रसिद्धीच्या शिखर गाठणाऱ्या असंख्य भटक भवानी या आधीही येऊन गेल्या आहेत. तारुण्य ओसरल्यावर त्यांचे कुत्राही हाल खाताना दिसत नाहीत. अनन्या पांडे, मंदिरा बेदीसारख्या सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेल्या डझनावर अभिनेत्री येऊन गेल्या ,आता त्या कुठे आहेत ? काय करीत आहेत ? याची कुणालाही खबरबात नाही एवढी त्यांची वाईट अवस्था झाली आहे. तारुण्य आहे तोवर ते दाखवत गावभर फिरणारी उर्फी जावेद सुद्धा त्याच मार्गाची प्रवासी बनली आहे. कंबर आणि छातीवर लाज सुद्धा झाकणार नाही एवढ्या चिंध्या परिधान करून बाहेर येणाऱ्या उर्फीवर कॅमेऱ्यांचा लखलखाट उडतो, अनेक आंबटशौकीन पत्रकार तिच्या मुलाखती घेतात त्यामुळे उर्फी कधीच जमिनीवर येताना दिसत नाही. असंख्य सिने साप्ताहिक,मासिक आणि दैनिके याना असा डोळे शेकणारा मसाला नियमित हवा असतो. अनेकांचा खप त्यावरच अवलंबून असतो.
उर्फीसारख्या नट्या अशा माध्यमांना कायमच्या मसाला पुरवू शकत नाहीत. जग एवढे विराट आहे की इथे पटापट जागा भरल्या जातात. आज उर्फीने कुणाची जागा घेतली उद्या तिच्या जागेवर कुणीतरी विराजमान होऊन चावट माध्यमांना याहीपेक्षा गरम मसाला पुरवेल. उर्फीने एके काळच्या पॉर्नस्टार सनी लियोनीला सुद्धा मागे टाकले आहे. आयुष्यात दीर्घकाळ देहव्यापाराच्या क्षेत्रात काम करून अलीकडे भारतीय सिने जगतात स्थिर झालेल्या सनी लियोनीचे वर्तन आणि जगाकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन बघितला तर या भगिनींचा कुणालाही अभिमान वाटावा असे असताना उर्फी सारखी नटी संबंध स्त्री जातीला अपमानित करीत असल्याची खात्री पटते. उर्फी जावेद ज्या इस्लाम मधून येते त्याचे मुल्ला,मौलवी आणि मुफ्ती यांचेही कोणते नियंत्रण तिच्यावर नाही किमान समाजातील काही सभ्य लोकांनी तरी तिची अक्कल ठिकाणावर आणण्याची गरज आहे.
चित्रपट जगतात रूप,शरीर किंवा अंगप्रदर्शन याना काडीचीही किंमत नाही हे आजवर अनेक नट्यानी आपल्या अभिनयाच्या जोरावर दाखवून दिले आहे. आयटम गर्ल म्हणून एक काळ गाजवलेली सिल्कस्मिता काजवा ठरली आणि कोणतेही अंग न दाखवता अभिनयाच्या बळावर हेमा मालिनी आजही स्वप्नसुंदरी या पदावर कायम आहे. सीमा विश्वास,मिता वशिष्ठ सारख्या कोणत्याही अंगाने रूपवान नसणाऱ्या स्त्रिया या क्षेत्रातील उत्तुंग पुरस्काराला हात लावून कधीच आलेल्या आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. उर्फी जावेद सारख्या रस्त्यावर तरुणांच्या काम भावना चालवणाऱ्या आणि शालीन स्त्रियांना मन खाली घालण्यास भाग पाडणाऱ्या नटव्यांचा बंदोबस्त कायद्यानेच करायला हवा. असे करताना स्त्रीस्वातंत्र्याचा कोणताही बाऊ कुणाला करता येऊ नये.
०००
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -९८९२१६२२४८