कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवारपर्यत मागितली मुदत
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी कामगार नेते रविंद्र सावंत यांची कार्यप्रणाली गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा कामगार क्षेत्राला जवळून पहायला मिळाली. पाच वर्षे पीएफचा भरणा न होणे, वेतनास विलंब होणे अशा विविध समस्या घेवून तेरणा रुग्णालयातील सफाई कर्मचारी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांना भेटण्यासाठी गुरुवारी सकाळी नेरूळ सेक्टर २ मधील इंटकच्या कार्यालयात आले होते. समस्या ऐकल्यावर व पीएफ पाच वर्षे न भरल्याचे समजल्यावर कामगार नेते रविंद्र सावंत यांनी कामगारांना घेवून तात्काळ नेरूळ स्टेशनसमोरील तेरणा रुग्णालयासमोरच कामगारांच्या शोषणाबाबत निदर्शने व जोरदार घोषणाबाजी सुरु केली. या आंदोलनाची दखल तेरणा रुग्णालयाला घ्यावी लागली व त्यांनी या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवार पर्यंतची वेळ कामगार नेते रविंद्र सावंत यांच्याकडून मागून घेतली.
तेरणा रुग्णालयात सफाई व अन्य कामांसाठी गोल्डन हॉस्पिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. (कार्यालय : ऑफिस क्रं २२२, दुसरा मजला, कुशवाह चेंबर्स, मकवाना रोड, अपूर्वा इंडस्ट्रीयल इस्टेटसमोर, मरोळ नाका, अंधेरी पूर्व, मुंबई) या कंपनीला कंत्राट दिलेले आहे. या कंपनीकडून कार्यरत कर्मचाऱ्यांना मागील दीड महिन्यापासून वेतन दिलेले नाही. कंपनीने या कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागील ५ वर्षांपासून पीएफचाही भरना केलेला नाही. पगारी रजाही दिल्या जात नसून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पगारी रजाही शिल्लक आहे. कर्मचारी रुग्णालयाचेच काम मागील अनेक वर्षांपासून करत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविणे रुग्णालय व्यवस्थापणाचे काम आहे. या कर्मचाऱ्यांचा थकीत पीएफचा भरणा, थकीत वेतन व पगारी रजांचे पैसे रुग्णालय व्यवस्थापणाकडून तात्काळ मिळण्यासाठी इंटक नवी मुंबईच्या माध्यमातून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच कामगार नेते रविंद्र सावंत यांनी आंदोलनास व घोषणाबाजीस सुरुवात केली. आंदोलन सुरु होताच रुग्णालय व्यवस्थापणाने कामगार नेते रविंद्र सावंत यांच्याशी चर्चा करताना सोमवारपर्यतची मुदत मागून घेतली. कर्मचारी आंदोलनाचा दणका देताच रुग्णालय व्यवस्थापणाला जाग आल्याने कर्मचाऱ्यांनी इंटकमुळेच आम्हाला न्याय मिळणे शक्य असल्याचा आशावाद व्यक्त केला. या आंदोलनात शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.