अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : एनएमएमटीच्या तुर्भे, आसूडगाव, घणसोली आगारामध्ये तातडीने कर्मचाऱ्यांकरीता उपहारगृह सुरु करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे एका निवेदनातून केली आहे.
राज्यात नव्हे तर देशामध्ये नवी मुंबई महापालिकेची श्रीमंत महापालिका म्हणून गणना होत आहे. या महापालिकेला कामकाजानिमित्त राज्य व देशपातळीवर सतत पुरस्कारांचा वर्षाव होत असतो. अडीच हजार कोटीच्या एफडी या महापालिकेच्या आहेत. हा सर्व नावलौकीक व भरभराट कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळेच शक्य झालेली आहे. या कर्मचारी व अधिकाऱ्यांचीही महापालिकेने तितकीच काळजी घेणे व त्यांना सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे तुर्भे, आसूडगाव व घणसोली असे तीन आगार कार्यरत आहेत. एनएमएमटीच्या बसेसचे संचलन तसेच दुरुस्ती या आगारांमध्येच होत असते. या तीनही आगारांमध्ये महापालिका प्रशासनाने कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी उपहारगृह सुरू करणे आवश्यक आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या श्रमपरिहारासाठी लवकरात लवकर प्रशासनाने उपहारगृह सुरु केल्यास आगाराच्या बाहेर जाण्याची कर्मचारी व अधिकाऱ्यांना गरज भासणार नाही व वेळही वाचेल. उपहारगृह सुरु करण्याबाबत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मागणीला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर संबंधितांना तीनही आगारांमध्ये उपहारगृह सुरु करण्याचे निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.