संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने विविध समाज घटकांसाठी लोककल्याणकारी योजना अंमलात आणल्या जात असून त्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि उपक्रम राबविण्यात येत असतात. अशाच प्रकारे ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी ९ वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना विष्णुदास भावे नाट्यगृह येथे प्रारंभ होत असून यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित ‘लोकशास्त्र सावित्री’ हा विशेष नाटयप्रयोग संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे यावेळी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वेगवेगळया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी विष्णुदास भावे नाटयगृहाच्या पॅसेजमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था, मुली व महिला यांनी उत्पादित केलेल्या साहित्याच्या विक्रीसाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याद्वारे महिलांनी निर्माण केलेल्या वस्तू व साहित्याला बाजार उपलब्ध होऊन हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांना कूपन देण्यात येणार असून लकी ड्रॉद्वारे विजेत्या महिलांना पैठणी देण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महिलांनी एकत्रितपणे जमून अत्यंत आनंदाने जागतिक महिला दिन साजरा करावा यादृष्टीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रेरणादायी विचारांचा नाट्यस्वरूपातील लाभ घेण्यासाठी तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नवी मुंबईतील महिला भगिनींचे कौतुक करण्यासाठी महिलांनी या कार्यक्रमाप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.