अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शहराचा प्रारूप विकास आराखडा संदर्भात नवी मुंबईकरानी केलेल्या हरकती व सूचनांची सुनावणी महापालिका प्रशासनाकडून १४ मार्च ते २८ मार्च दरम्यान नवी मुंबई महापालिका मुख्यालयात सुरू आहे. नवी मुंबई शहरात ‘जागर जनजागृती’चा मोहिमेत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत (नाना) यांनी जागरूक नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात यासाठी अभियानही राबवले होते. या अभियानामध्ये नवी मुंबईकरांकडून १२ हजाराहून अधिक सूचना आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई प्रारूप विकास आराखडा जनसुनावणी खंडपीठ समितीसमोर माजी विरोधी पक्ष नेता दशरथ भगत (नाना) यांनी आपली भूमिका मांडली. सर्व सूचनांवर खंडपीठाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती यावेळी भगत यांनी केली .
नवी मुंबई शहरातील पुढील दोन दशकांचा सुमारे २८ लाख वाढीव लोकसंख्येचा आढावा घेत पाणी स्रोत, डम्पिंग ग्राउंड नियोजन काय? एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्टी आणि महसुली गावे नियोजनातून का वगळली? पर्यायी नागरी हक्काचे कसे उल्लंघन झाले आहे. तसेच नवी मुंबईतील २९ गावातील भूमीपुत्रांचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकार याची जाणीव महापालिकेने का ठेवली नाही? सिडको, एमआयडीसी, सीआरझेड, वन, कांदळवन या शासनाच्या प्राधिकरणामुळे वर्तमान आणि भविष्यातील विकास कामांना कशी बाधा पोहचणार आहे याची कारणमीमांसा सुनावणी समितीसमोर दशरथ भगत (नाना) यांनी विशद केली .प्रारूप विकास आराखड्यामुळे नवी मुंबईतील मूळ ग्रामस्थ, शहरातील नागरिक यांना कसा आघात पोचणार आहे? त्यांना प्राप्त झालेल्या घटनात्मक मूल्यांचे व कर्तव्याचे नवी मुंबई मनपाने प्रारूप विकास आराखडा तयार करताना कशी पायमल्ली केली आहे याचे कायद्याच्या सबळ पुराव्यानिशी नियोजन समितीच्या खंडपीठासमोर सादरीकरण दशरथ भगत (नाना) यांनी केले.
एमआयडीसी, सिडको व इतर शासकीय आस्थापनांनी नवी मुंबईतील मोकळी जमीन, इरादापत्र जाहीर करूनही डिसेंबर २०१७ नंतर जमीन विक्री केली. कायद्याचे उल्लंघन सुरू आहे त्यास विरोध करावा, शासकीय आस्थापनाने नागरी सेवेसाठी राखीव ठेवलेली जमीन संबंधिताशी केलेला करार रद्द करून पुन्हा शासनाकडे वर्गीकृत करावी अशी मागणी सुनावणीसमोर दशरथ भगत (नाना) यांनी मागणी केली आहे. भविष्यात एमआयडीसी क्षेत्रात औद्योगिक व रोजगार निर्मितीच्या व्यतिरिक्त ‘चेंज ऑफ युज’च्या नावाखाली रहिवासी वापरासाठी शासनाने परवानगी देऊ नये जेणेकरून भविष्यात नवी मुंबई शहरातील प्रश्न अधिक गंभीर होतील याची दक्षता घ्यावी असे इतर अनेक मुद्दे सर्वश्री प्रकाश पोकते, प्रा. डॉ केशव सांगळे, नीता पाकधने, सोमनाथ केकान आदींसमोर दशरथ भगत (नाना) यांनी मांडले. यावेळी नवी मुंबई मनपा नगर रचना विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक उपस्थित होते.