अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राद्वारे दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच दिव्यांगत्वाविषयी जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून २१ मार्च रोजीच्या जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.
डाऊन सिंड्रोम हा एक शारीरिक व मानसिक विकार असून तो गुणसूत्रीय असंतुसनामुळे होतो. डाउन सिंड्रोम साधारणपणे वेगवेगळ्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या बौद्धिक, शारीरिक दिव्यांगत्व आणि त्यासंबंधीच्या वैद्यकीय समस्यांना कारणीभूत ठरतो. सामान्य व्यक्तींपेक्षा डाऊन सिंड्रोम असणाऱ्यांची शारीरिक व मानसिक वाढ कमी असते.
डिसेंबर २०११ मध्ये युनाईटेड नेशन्सच्या जनरल असेम्बलीने २१ मार्च हा दिवस जागतिक डाऊन सिंड्रोम दिन म्हणून जाहीर केला आणि २१ मार्च २०१२ पासून जागतिक डाऊन सिंड्रोम दिन जगभरात साजरा होऊ लागला.
डाऊन सिंड्रोम विषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी सर्वांनी हा दिवस योग्य रितीने पाळावा असे आवाहन युनाईटेड नेशन्सच्या वतीने करण्यात आले असून यावर्षीचा संदेश With Us Not For Us असा आहे. या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तीकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेतून न बघता त्यांना योग्य व समान वागणूक मिळून त्यांच्यासाठी इतरांप्रमाणे संधी निर्माण होणे गरजेचे असल्याचे युनाईटेड नेशन्सने जाहीर केले आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका ईटीसी केंद्राच्या वतीने कला व हस्तकला संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींकडून कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात २१ मार्च रोजी डाऊन सिंड्रोम मुलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात २३ मार्च रोजी डाऊन सिंड्रोम मुलांच्या पालकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये नेमप्लेट बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
त्याचप्रमाणे डाऊन सिंड्रोमबाबत जनजागृती व्हावी यादृष्टीने पोस्टर कॅम्पेन राबविण्यात आले. यामध्ये मतिमंद विभागातील मुले व शिक्षक यांनी एकत्रितरित्या पोस्टर्स बनवून त्याद्वारे डाऊन सिंड्रोम मुलांमधील क्षमता, त्यांच्यासाठीच्या संधी याविषयीची माहिती प्रसारित केली. याठिकाणी पोस्टर्स प्रदर्शनासोबत सेल्फी काढण्यासाठी एक सेल्फी पॉईंट बनवण्यात आला होता. मार्च महिन्यामध्ये डाऊन सिंड्रोम मुलांसाठी नाविन्यपूर्ण खेळांचे आयोजनही करण्यात येत आहे. त्यासोबतच जागतिक डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्याकरिता ईटीसी केंद्रामध्ये होर्डींग्ज लावण्यात आली आहेत.