नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४ येथील महापालिकेच्या नियोजित पशुवैद्यकीय रुग्णालयास डॉ. वैभव झुंजारे यांचे नाव देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व पशुवैद्यकीय उपायुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
जुईनगर सेक्टर २४ येथे महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामही जवळपास पूर्ण झालेले आहे. लवकरच या रुग्णालयाचे महापालिका प्रशासनाकडून उद्घाटन होऊन रुग्णालय सेवेत रुजू होईल. डॉ. वैभव झुंजारे हे महापालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी होते. महापालिका प्रशासकीय सेवेत त्यांचे अतुलनीय योगदान होते. आरोग्य विभागातील कर्मचारी ते अधिकारी सर्वांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. ‘जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला’ ही उक्ती डॉ. झुंजारे यांच्याबाबतीत लागू पडली. काही वर्षांपूर्वी त्यांचे अपघाती निधन झाले व आरोग्य विभागावर शोककळा पसरली. या अधिकाऱ्यांची सेवा व कार्य पाहता डॉ. झुंजारे यांचे नाव व कार्य जोपासण्यासाठी महापालिका प्रशासनाने या पशुवैद्यकीय रुग्णालयास डॉ. वैभव झुंजारे यांचे नाव देण्याची लेखी मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.