अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २, भुखंड क्रं १ येथील महापालिका उद्यानात असलेल्या वॉकिगसाठी असलेल्या मार्गिकेतील पदपथाची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाने नेरुळ व जुईनगरमधील रहीवाशांसाठी नेरुळ सेक्टर २ येथील भुखंड क्रमांक १ वर उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात स्थानिक रहीवाशांना चालण्यासाठी बनविण्यात आलेल्या मार्गिकेसाठी पदपथाची दुरावस्था झालेली आहे. पेव्हरब्लॉक काही ठिकाणी निखळून पडले आहेत. तसेच काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक दबले गेले असल्याने मार्गिकेचा काही भाग वरखाली झाल्याने रहीवाशी अडखळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. उद्यान बनवून महापालिकेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही तर त्या उद्यानाची वेळोवेळी डागडूजी करणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. करदाते नागरिक या उद्यानात चालताना पडत आहेत. त्यांना जखमा झाल्या आहेत. ही बाब महापालिका प्रशासनाला भूषणावह नाही. तरी समस्येचे गांभीर्य पाहता आपण उद्यानातील चालण्याच्या मार्गिकेची तात्काळ डागडूजी करण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.