अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : एलआयसीच्या नावाने महिला वर्गाला संपर्क करून पैसे लुबाडणारी नवी टोळी कमालीची सक्रिय झाली असून नवी मुंबईकरांनी अशा फेक कॉलपासून सावध राहावे यासाठी नवी मुंबई लाईव्ह परिवाराकडून नवी मुंबईकरांना व वाचकांना आवाहन करण्यात येत आहे.
सर्वप्रथम महिला वर्गाच्या मोबाईल फोनवर एक फोन येतो. त्यात आम्ही एलआयसीतून बोलत आहोत. आपल्या वडीलांच्या खात्यात तीन वेळा पैसे ट्रान्सफर करूनही जमा झाले नाहीत. तुमच्या वडीलांनी तुमचा मोबाईल नंबर दिला आहे. हा नंबर गुगल पे आहे का अशी विचारणा केली जाते. विशेष म्हणजे हे कॉल महिलांनाच येतात. महिलेने हा उत्तर देताच सुरुवातीला १० रुपये व त्यानंतर दोन वेळा रक्कम खात्यात जमा झाल्याचा मेसेजही येतो. अर्थात हा मेसेजही फेक असतो. बॅंकेच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झालेली नसते. त्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरुन फोन येतो. चुकून जास्त पैसे जमा झाले आहे, पैसे जे अतिरिक्त जमा झाले आहेत, ते परत तुम्ही गुगल पे ने परत या नंबरवर पाठवा असे सांगितले जाते. फेक मेसेजवर विश्वास ठेवणाऱ्या महिलांनी पैसे परत केल्यास त्यांची फसगत होते व ज्या महिला सावध असतात, पैसे परत करत नाहीत, त्यांना वारंवार फोन करून गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली जाते. धमकावले जाते. नंबर ब्लॉक केला तरी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो. या नंबरवरून कॉल येतात, आपण पुन्हा कॉल केल्यास कॉल त्या नंबरवर जात नाही.
नवी मुंबईकर महिलांना व वाचकांना पुन्हा एकवार सावध करण्यात येत आहे की, एलआयसी अथवा अन्य कोणतीही वित्तीय संस्था तसेच बॅंक गुगल पेवर पैसे देत नाही, ते खात्यातच पैसे जमा करतात. गुगल पेवर पैसे जमा केल्याचे मेसेजही फेक असतात. बॅंकेत कोणतेही पैसे जमा होत नाहीत. बॅकेत खातरजमा करून घ्यावी म्हणजे खात्री पटेल. असे फोन वारंवार येत असल्यास तात्काळ पोलिसांना कल्पना द्या. फेक कॉल व फेक मेसेजवर विश्वास ठेवू नका. फसगत टाळा. समोरून कोणी सतत फोन करत असेल तर त्याचा नंबर ब्लॉक करा तसेच स्थानिक पोलिसांत तक्रार करा. कोणतेही अतिरिक्त पैसे गुगल पे ने परत करू नका, यात अडकून स्वत:ची फसवणूक करून घेवू नका, असे आवाहन नवी मुंबई लाईव्ह परिवाराकडून आपणास करण्यात येत आहे.