अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सुश्रुषा रूग्णालयसमोरील महापालिका उद्यानाच्या नामफलकावरील अक्षरे गळून पडलेली असल्याने नामफलकाची दुरूस्ती करण्याची व या उद्यानाला अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सुश्रुषा रूग्णालयासमोरच अनधिकृत फेरीवाल्याच्या विळख्यात महापालिकेचे उद्यान आहे. या उद्यानाला सीव्ह्यू उद्यान असे नाव आहे. या उद्यानाच्या नामफलकावरील काही अक्षरे गळून पडली आहेत. त्यामुळे उद्यानाचा नावाचा बोध येत नाही व नामफलकावरील अर्धवट नावामुळे फलकाला अवकळा प्राप्त झालेली आहे. तसेच या उद्यानाच्या संरक्षक भिंतीलगतच पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापला आहे. पामबीच मार्गावरून आल्यावर नेरूळ सेक्टर सहा, बारा, चौदा, दहा, सोळा, अठरा, चोवीसकडे जाताना या उद्यानापासूनच वळसा घेऊन जावे लागते. दर्शनी भागात असणाऱ्या या उद्यानालगतच फेरीवाले बसलेले असल्याने परिसराला व उद्यानाला बकालपणा आलेला आहे. या उद्यानापासून हाकेच्या अंतरावरच महापालिका विभाग कार्यालय असताना पालिकेचा अतिक्रमण विभाग या बकालपणाकडे कानाडोळा करत फेरीवाल्यांना आश्रय देत असल्याचा संताप रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे. आपण पालिका प्रशासनातील संबंधितांना नामफलकाची दुरूस्ती करण्याचे व उद्यानाला फेरीवाल्यांच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.