`स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : देशाचे माजी संरक्षणमंत्री व कृषीमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने आनंदोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत नैराश्येचे वातावरण होते. अनेक ठिकाणी या निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलने करण्यात येत होती. त्या आंदोलनाचे रूपांतर आज जल्लोषात झाले. कारण होते ते म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांना सावली देणाऱ्या आधारवड म्हणजे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. हा जल्लोष साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते वाशी येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरांमध्ये आणि फटाक्यांच्या आतीषबाजीमध्ये कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाचत गाजत हा आनंदोत्सव जल्लोषात साजरा केला. भारताने विश्वचषक जिंकल्याचा आनंदासारखाच आनंद सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. याप्रसंगी एक दुसऱ्याला मिठाई भरवण्यात आली. प्रत्येकाचे तोंड गोड करण्यात आले आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुतकी कळा पूर्णपणे नष्ट होऊन एक नवीन उत्साह त्यांच्यामध्ये संचारला होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, माजी नगरसेवक राजू शिंदे, वाशी तालुका अध्यक्ष सतनामसिंग, नेरूळ तालुका अध्यक्ष रघुनाथ गोळे, तुर्भे तालुका अध्यक्ष नियाज शेख, सीबीडी तालुका अध्यक्ष सुधीर कोळी, सेवादलचे बाळू झरे, संतोष आहेर, सचिन पाटील, सेवादल सीबीडी तालुका अध्यक्ष. रमेश मिस्त्री, जिल्हा सरचिटणीस नितीन सावंत, जिल्हा सचिव दत्ता माने, नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार, महिला आघाडीच्या साधना वाणी, साधना ढवळे सौ.आशा नायकडे, उत्तरा पाटील सौ.शोभा चौगुले, तसेच अंकुश म्हात्रे, नरेश सुतार, रामचंद्र म्हात्रे, सचिन पाटील, किशोर पाटील आणि इतर अनेक मान्यवर या जल्लोषामध्ये सामील झाले होते.