स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ पश्चिम परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात नवी मुंबई महापालिका प्रशासनाला राज्यात सलग दोन वेळा प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळालेले आहे. केंद्र व राज्य स्तरावर सातत्याने स्वच्छतेचा जागर करत असल्याने तेथेही पारितोषक सातत्याने मिळत आहे. देशातही तिसऱ्या क्रमाकांचा आपण पुरस्कार घेतला आहे. परंतु नेरूळ पश्चिम परिसर पाहिल्यावर त्या लोकांनी नक्कीच पुरस्कार देताना नेरूळ पश्चिमची पाहणी केली नसणार. नेरुळ पश्चिमेला पदपथावर सर्रासपणे अतिक्रमण केले असून अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांवर कारवाई न करता त्यांना खतपाणी घालत आहे. कदाचित फेरीवाल्यांकडून पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दर महिन्याला लाडू, काजू कतरी व अन्य मिठाई मिळत असावी. त्यामुळेच मिठाईच्या गोडव्याला जागत अतिक्रमण विभाग फेरीवाल्यांची पाठराखण करताना नेरूळ पश्चिमच्या बकालपणा पालिकेचेच वेतन घेत खतपाणी घालत आहे. पदपथावर फेरीवाले असल्याने रहीवाशांना रस्त्यावर चालावे लागतले. दुतर्फा वाहने उभी असल्याने पादचाऱ्यांना वाहनांची धडकही बसते. नेरूळ सेक्टर १० साईबाबा चौक येथील सर्व बाजूचे पदपथ पूर्णपणे व्यापलेले आहे. नेरूळ सेक्टर २ येथील राजीव गांधी उड्डाण पुलापासून ते नेरूळ रेल्वे स्टेशनपर्यत पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण पहावयास मिळते. राजीव गांधी उड्डाणपुलाखाली तर दिवसा तर दिवसा परंतु मध्यरात्री फेरीविक्रेते व्यवसाय करताना दिसून येतात. नेरूळ रेल्वे स्टेशन पश्चिम परिसराला फेरीवाल्यांचा गराडाच दिसून येतो. सेक्टर २६, १६,१८, नेरूळ गाव चौक येथेही फेरीवाले पदपथावर असतात. नेरूळ सेक्टर सहामध्ये पामबीच मार्गे येताना पहिलाच वळसा घेताना सुश्रुषा रूग्णालयानजीक सीव्ह्यू उद्यानाच्या बाहेरच्या पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे. सारसोळे मच्छिमार्केटच्या परिसरात फेरीवाल्यांनी रस्त्यावर बस्तान मांडले आहे. फेरीवाल्यांनी पदपथ व्यापले असून परिसरालाही बकालपणा आला आहे.
याशिवाय नेरूळ पश्चिमेला राजीव गांधी उड्डाण पुल ते पामबीचकडे आल्यास रात्री १२ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यत विविध फेरीवाले खाद्यपदार्थाची, पेयांची रस्त्यावर हातगाडी तर टेम्पो लावून विक्री करत असतात. फेरीवाल्यांचा नेरूळ पश्चिमचा उद्रेक पाहिल्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नेरूळ पश्चिम परिसर फेरीवाल्यांकडून कदाचित मिळत असलेल्या मिठाईमुळे आंदण केला असावा. समस्येचे गांभीर्य पाहता आपण अतिक्रमण विभागाला पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी दररोज फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देवून येथील बकालपणा संपुष्ठात आणण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.