नवी मुंबई : नेरूळ नोड, प्रभाग ९६ मधील सेक्टर १६, १६ए आणि १८ परिसरातील मल:निस्सारण वाहिन्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्याची लेखी मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाळा आता जेमतेम महिन्यावर आलेला आहे. सेक्टर १६, १६ए आणि १८ परिसरातील मल:निस्सारण वाहिन्यांची तपासणी व सफाई करणे आवश्यक आहे. अनेकदा पावसाळ्यामध्ये या परिसरामध्ये रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्याची झाकणे बाजूला पडतात अथवा त्या झाकणातून पाणी बाहेर पडत असते. पावसाच्या पाण्यात हेही पाणी वाहत असल्याने परिसरातील रहीवाशांना, पादचाऱ्यांना तसेच ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अनेकदा त्या वाहिन्यातून मलही रस्त्यावर विखुरलेले असते. नवी मुंबईसारख्या शहराला ही बाब भूषणावह नाही. पावसाळीपूर्व कामांमध्ये आपण गटारांची सफाई करतो, वृक्षछाटणी करतो, त्याचधर्तीवर पावसाळ्यापूर्वी वरिल परिसरातील रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्यांची तपासणी करून सफाई करावी. जिथे जिथे चोकअप असेल तो काढण्यात यावा. जेणेकरून पावसाळ्यात स्थानिक रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करण्याची व आजारी पडण्याची वेळ येणार नाही. संबंधितांना तसे निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.