स्वयंम फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : सिडकोतर्फे नवी मुंबईतील कळंबोली येथे उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्रातील (डीसीएचसी) २ व्हेपोरायझरसह असलेल्या अनुक्रमे ३० किलोलीटर व १० किलोलीटरच्या द्रवरूप ऑक्सिजनच्या साठवण टाक्या (एलएमओ), एका व्हेपोरयझरसह २४० लीटरच्या द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे १० सिलेंडर (डुरा) आणि ४६.७० लीटरचे (जम्बो) वैद्यकीय ऑक्सिजनचे ४८ सिलेंडर पनवेल महानगरपालिकेला विनामूल्य हस्तांतरीत करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाने २०२१ मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान अधिकाधिक रुग्णांवर उपचार करता यावेत याकरिता मुंबई महानगर प्रदेशात समर्पित कोविड आरोग्य केंद्रांची उभारणी करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. त्यानुसार, सिडकोने अल्प कालावधीतच मुंबईतील कांजूरमार्ग व मुलुंड यांसह नवी मुंबईतील कळंबोली येथील कॉटन कॉर्पोरेशनच्या गोदामामध्ये कोविड आरोग्य केंद्राची उभारणी केली. कळंबोली येथील ६३५ खाटांच्या या आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय साधने, सीसीटीव्ही यंत्रणा, पीए सिस्टीम, आयटी, अग्निशमन यंत्रणा, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजनच्या साठवणीसाठी टाक्या इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या केंद्राच्या उभारणीसाठी सिडकोला सल्लागार शुल्कासह २९.७९ कोटी रुपये इतका खर्च आला होता.
पनवेल महापालिकेला या केंद्रांचे हस्तांतरण केल्यानंतर ८ ऑक्टोबर २०२१ रोजी या केंद्राचे उद्घाटन होऊन पनवेल महापालिकेकडून या केंद्राचे परिचालन करण्यास सुरूवात झाली. कोविड रूग्णांच्या संख्येत सातत्यपूर्ण घट झाल्यानंतर ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सदर केंद्र पनवेल महानगरपालिकेकडून बंद करण्यात आले. यानंतर, या कोविड आरोग्य केंद्रातील वरिल नमूद सुमारे ८० लाख रुपयांच्या वैद्यकिय सामुग्रीचे पनवेल महापालिकेला विनामूल्य हस्तांतरण करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे
०००
“महाराष्ट्र शासानाच्या निर्देशानुसार कोविड पॅनडेमिकच्या कठीण काळात सिडको महामंडळाने मुंबई महानगर प्रदेशातील वैद्यकिय गरजांची पूर्तता केली होती. नागरिकांना उत्तम पायाभूत सुविधा पुरवण्यासोबतच त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहिल यादृष्टीने सिडको महामंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. या निर्णयामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील.”
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको