स्वयंम न्युज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या सारसोळे गावातील महापालिका शाळा क्रं १२ या ठिकाणी मुख्याध्यापक व शिक्षक उपलब्ध करून देणेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा सचिव महादेव पवार पालिका प्रशासनदरबारी करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच या शाळेला मुख्याध्यापक व शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षण अधिकारी घनवट यांनी दिली.
सारसोळेच्या महापालिका शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक नसल्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा सचिव महादेव पवार सातत्याने पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत आहे. यासंदर्भात महादेव पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्यासमवेत शिक्षण मंडळ कार्यालयात प्रभारी शिक्षण अधिकारी घनवट यांची भेट घेत समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.
सारसोळे गावातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महापालिकेच्या शाळा क्रं १२ मध्ये गेल्या सहा-सात वर्षापासून शाळेच्या प्राथमिक विभागाला मुख्याध्यापक जागा रिक्तच आहे. तसेच माध्यमिक विभागासाठीही या शाळेला स्वतंत्र मुख्याध्यापक नसून शाळेतील शिक्षकाकडे मुख्याध्यापदक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. प्राथमिक विभागाला गेल्या सहा-सात वर्षापासून मुख्याध्यापकच नसणे ही बाब नवी मुंबई महापालिका प्रशासनाला भूषणावह नाही. माध्यमिक विभागाला स्वतंत्र मुख्याध्यापक नाही. सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहामधील नागरिक नवी मुंबईचे रहीवाशी नाहीत का? ते करदाते नाहीत का? मग या शाळेला प्राथमिक व माध्यमिक विभागाला मुख्याध्यापक का दिला जात नाही? असा प्रश्न महादेव पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
या शाळेत आधीच शिक्षकांचा तुटवडा असतानाच या शाळेतील एक शिक्षक कुकशेत गावातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला देण्यात आला आहे. आधीच येथे मुख्याध्यापक व शिक्षक कमतरतेचा खेळखंडोबा असताना अन्यत्र नवीन शिक्षक देणे आवश्यक होते. येथील शिक्षक वर्ग करण्याची गरज नव्हती. या शाळेची पटसंख्या २५६ असून बालवाडीत ३५ मुले शिक्षण घेत आहेत. एका एका शिक्षकाला दोन वर्ग सांभालावे लागत असतील तर शिक्षण काय मिळत असेल? मुलांकडे कितपत लक्ष दिले जात असेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ही शैक्षणिक समस्या आज भस्मासूराचे स्वरूप धारण करत आहे. हा भस्मासूर गाडण्यासाठी व सारसोळे गाव तसेच नेरूळ सेक्टर सहाच्या मुलांना चांगल्या दर्जांचे शिक्षण मिळण्यासाठी या शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शाळेला लवकरात लवकर मुख्याध्यापक व माफक प्रमाणावर शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी महादेव पवार यांनी या बैठकीत केली.
या बैठकीत चर्चेदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी गेल्या काही महिन्यापासून सारसोळेच्या महापालिका शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक नसल्याबाबत संताप व्यक्त केला. पालिकेला शिक्षक नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही पालिकेला शिक्षक देतो व त्या शिक्षकांचा पगारही आम्ही देतो, पण पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीबांची मुलांच्या शिक्षणाचे नुकसान करू नका. पालिकेला जे जे लागेल ते सांगा, आम्ही आमच्या खिशातून उपलब्ध करून देवू, पण गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करू नका असा इशारा यावेळी नामदेव भगत यांनी चर्चेदरम्यान दिला.
प्रभारी शिक्षण अधिकारी घनवट यांनी १५ ते २० दिवसात शिक्षक व मुख्याध्यापक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पालिका प्रशासनाने सारसोळेच्या शाळेला शिक्षक व मुख्याध्यापक लवकर न मिळाल्यास शाळेच्या आवारातच स्थानिकांसमवेत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी दिला.