स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडावासियांना दिंडीचा, वारीचा, पालखीचा अनुभव घेता यावा आणि पंढरीला जाण्याचा योग आला नाही तरी आपल्याच विभागात दिंडीरूपी विठ्ठल नामाचा जयघोष करत येथेच पंढरीसम वातावरण निर्माण व्हावे यासाठी साईभक्त सेवा मंडळ आणि साईभक्त महिला फांऊडेशनच्या वतीने गुरूवार, दिनांक २८ जुन रोजी आषाढी एकादशी सानपाडा दिंडी सोहळा-२०२३चे आयोजन करण्यात आले आहे.
साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले आणि समाजसेवक पांडुरंग आमले तसेच विभागातील साई भक्तांकडून आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्यातून या सानपाडा दिंडी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान हा दिंडी सोहळा काढण्यात येणार असून सानपाडा सेक्टर दोनमधील शिवमंदिरापासून या दिंडीस सुरूवात होणार आहे.
कामामुळे अथवा अन्य अडचणींमुळे प्रत्येकालाच आषाढी एकादशीला विठू माऊलींचे दर्शन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे सानपाडावासियांना आपल्याच विभागात विठू माऊलींच्या पालखीत सहभागी होत यावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात सानपाडावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केले आहे.