गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई -: आ. गणेश नाईक व नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात देश फाळणी विभाजन विभीषीका स्मरण दिनानिमित्त ऐरोली विधानसभा क्षेत्रात मूक रॅलीचे आज आयोजन करण्यात आले होते.
भारत-पाकिस्तान फाळणीच्या भयानकतेचा स्मृतिदिवस हा १४ ऑगस्ट आहे . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना लाखो लोकांना विस्थापित करणारा आणि मृत्यूच्या दाढेत टाकणारा देश फाळणीचा ७५ वर्षांपूर्वी घेतलेला अत्यंत चुकीचा निर्णय होता . १.३ कोटी लोकांना आपले घर आणि परिसरातून विस्थापित व्हावे लागले तर जवळपास १० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीचा त्रास सहन केलेले आणि त्यामध्ये जीव गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी १४ ऑगस्ट हा दिवस स्मृती दिवस म्हणून जाहीर केला . या दिवसाचे औचित्य साधून लोकनेते आमदार गणेश नाईक आणि भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात कोपरखैरणे डी मार्ट ते रा. फ.नाईक विद्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . या मूक मोर्चामध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक , भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक , माजी खासदार डॉ संजीव नाईक , माजी महापौर सागर नाईक यांच्या समवेत माजी नागरसवेक , भाजप कार्यकर्ते , पदाधिकारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मूक मोर्चा च्या सांगता प्रसंगी फाळणीवर आपले विचार मांडण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविनाश गव्हाणे उपस्थित होते . यावेळी रा. फ. नाईक विद्यालयात देश फाळणीची भयावहता दर्शविणारे चित्र प्रदर्शन देखील मांडण्यात आले होते.
कोट
स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना देशाच्या फाळणीमुळे ज्या लाखो देशवासीयांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या कित्येकांचे प्राण गेले त्या सर्वांना विभाजन विभीषीका स्मरण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
– आमदार गणेश नाईक