गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोड, सानपाडा गाव आणि सानपाडा पामबीच परिसरात घरोघरी जावून साथीच्या आजारांविषयी माहिती संकलित करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोड, सानपाडा पामबीच, सानपाडा गाव या परिसरात गेल्या काही दिवसांपासून मलेरिया, डेंग्यू, ताप आदी साथीचे रूग्ण आढळून येत आहेत. खासगी दवाखाने व खासगी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असल्याने पालिका प्रशासनाला ही माहिती अवगत होत नाही. आरोग्य विभागाच्या नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सानपाडा नोड, सानपाडा गाव आणि सानपाडा पामबीच परिसरात घरोघरी जावून साथीच्या आजारांविषयी माहिती संकलित करणे आवश्यक आहे. या अभियानात साथीचे आजार झाल्यावर काय करावे आणि साथीचे आजार होवू नये यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. संबंधितांना तातडीने साथीच्या आजाराविषयी माहिती संकलित करण्याविषयी निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.