गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील पालिकेच्या दोन उद्यानाच्या नामफलकाची दुरावस्था दुर करण्याची लेखी मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती आणि प्रभाग ८५च्या भाजपच्या माजी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडको वसाहतीमध्ये राजमाता जिजाऊ उद्यान व सीव्ह्यू नेरूळ उद्यान अशी महापालिकेची दोन उद्याने आहेत. वरूणा सोसायटीलगत महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यानाचे प्रवेशद्वार आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील नामफलकातील राजमाता जिजाऊ उद्यानातील अक्षरे गळून पडली आहे. महापालिका प्रशासनाने इतिहासात आदरणीय स्थान असलेल्या महापुरूषांची, थोर सेनानींनीची नावे एकतर वास्तुला देवू नयेत, नावे दिली तर त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वराज्याची निर्मीती करणाऱ्या शिवछत्रपतींच्या मातोश्रींचे नाव उद्यानाला दिले आहे. उद्यानाच्या नामफलकावरील नावे गळून पडली तरी नामफलकाची डागडूजी करण्याचे तसेच दुरूस्ती करून दुरावस्था तात्काळ दूर करण्याचे सौजन्यही महापालिका प्रशासनाकडून दाखविले जात नाही, ही खरोखरीच खेदाची बाब असल्याचे सुजाताताई सुरज पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
सुश्रुषा रूग्णालयानजीक नेरूळ सीव्ह्यू सोसायटीलगत महापालिकेचे सीव्ह्यू नेरूळ उद्यान आहे. या उद्यानाच्या नामफलकावरील अक्षरेही गळून पडली असल्याने उद्यानाच्या नामफलकाला दुरावस्था प्राप्त झाली आहे. स्वच्छता अभियानामध्ये केवळ संरक्षक भिंतींची रंगरंगोटी नवी मुंबईकरांना अपेक्षित नसून उद्यान व क्रिडांगणाचे सुशोभीकरण व सुविधांची मुबलकता अपेक्षित आहे. या दोन्ही उद्यानातील नामफलक बदलून त्याजागी नवीन नामफलक तातडीने बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सुजाताताई सुरज पाटील यांनी केली आहे.