आमदार गणेश नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या अविरत पाठपुराव्यामुळे ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव दिघे ऐवजी दिघा गाव असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या गृह (मोटार ) विभागाच्या सह सचिवांनी आज ३१ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय गृह विभागाला पत्र पाठवून या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक गेले सहा महिने सातत्याने यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करीत होते.
आता केंद्र सरकारकडून केवळ नामकरणाची औपचारिकता बाकी आहे. दिघा येथील लाखो रहिवाशांसाठी या स्थानकाच्या नामकरणाचा विषय त्यांच्या अस्मितेचा विषय होता. त्यामुळे या स्थानकाचे दिघा स्थानक असे नामकरण झाल्याचे समजतात येथील लाखो नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
तत्कालीन खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी २०१२ मध्ये दिघा स्थानकाची मागणी केली होती. त्यावेळेस लोकनेते आमदार गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. संदीप नाईक हे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते तर स्थानिक नगरसेविका अपर्णा गवते या होत्या. त्यानुसार दिघा स्थानकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. २०२३ मध्ये स्थानकाचे काम पूर्णत्वास गेले. डॉक्टर संजीव नाईक यांनी खैरणे बोनकोडे आणि दिघा अशी दोन स्थानके निर्मिती करण्याची मागणी मंजूर करून घेतली होती. त्यापैकी दिघा स्थानकाला चालना मिळून हे स्थानक प्रत्यक्षात उतरले आहे.
ज्या परिसरामध्ये हे स्थानक निर्माण झाले आहे. त्या परिसरातील सर्व नागरिकांची या स्थानकाला दिघा स्थानक नामकरण करण्याची मागणी होती. यासंदर्भात दिघा येथील स्थानिक लोकप्रतिनिधी नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते आणि नागरिकांनी लोकनेते आमदार गणेश नाईक यांना दिघा रेल्वे स्थानक नामकरणासाठी लेखी निवेदने दिली होती. रेल्वे प्रशासनाने या स्थानकाचे नाव मार्च २०२३ च्या नोटिफिकेशनने दिघा ऐवजी दिघे असे ठेवले होते. वास्तविक नवी मुंबईतील दिघा येथील प्रभाग रचना , निवडणूक आयुक्तांच्या नोंदीनुसार दिघा असेच नाव आहे परंतु काही घटकांनी दिघावासीयांची स्थानिक अस्मिता डावलून महसूल विभागाच्या जुन्या नोंदीचा दाखला देत दिघाऐवजी दिघे स्थानक नामकरण करण्याचा प्रयत्न केला होता या विरोधात दिघावासीयांच्या मनामध्ये प्रचंड रोष होता आणि येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत होते. लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय उपस्थित करून राज्य सरकारने दिघा स्थानक नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी तो केंद्रीय गृह विभाग रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागातील परिवहन खात्यामधून मंजूर होऊन तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय गृह विभाग येथे आज पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या स्थानकाचे नामकरण दिघा गाव रेल्वे स्थानक असे झालेले आहे. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी पियुष गोयल, विद्यमान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांच्याकडे दिघा स्थानकाच्या नामकरणासाठी प्रत्यक्ष भेटी घेऊन मागणीची लेखी निवेदने दिली होती. त्यामुळे दिघा गाव स्थानक नामकरण प्रत्यक्षात साकारले आहे.
दिघावासीय यांच्या वतीने लोकनेते आमदार गणेश नाईक यांचे आभार..
तमाम दिघावासीयांच्या भावना लक्षात घेऊन या स्थानकाचे नाव दिघा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते यांनी लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांचे आभार मानले आहेत.
अवतरण…
दिघा गाव रेल्वे स्थानक नामकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या स्थानकाचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्याची विनंती केली आहे. दिघा गाव रेल्वे स्थानक नामकरण हा दिघा येथील नागरिकांच्या अस्मितेचा विषय होता. आज अखेर हे नामकरण झाले आहे. याचे आम्हाला समाधान आहे.
– डॉक्टर संजीव नाईक, माजी खासदार
चौकट…
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार- डॉक्टर संजीव नाईक
दिघा गाव स्थानक नामकरण आणि हे स्थानक लवकरात लवकर सुरू करण्यासाठी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्यासोबत स्वतः रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुख्यमंत्री महोदयांकडे आले. नवी मुंबईच्या या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी सहकार्य करीत स्वतः पुढाकार घेतल्याबद्दल डॉक्टर संजीव नाईक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले आहेत.
चौकट….
दिघा स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू…
लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांनी दिघा स्थानकाचा पाहणी दौरा केला होता. या पाहणी दौऱ्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही त्रुटी आढळल्या याबाबत लोकनेते आमदार नाईक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेत या रेल्वे स्थानकात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी मान्य केली होती. त्यामुळे या रेल्वे स्थानकातील त्रुटी दूर करून येत्या काही दिवसांमध्ये दिघा रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी व्यक्त केला.