गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील तुलसी विहार सोसायटीतील दुर्घटना होवून दहा दिवसाचा कालावधी लोटला तरी मृतांच्या परिवारांना आर्थिक मदत करण्यास राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. बेलापुर मतदारसंघातील स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, शिंदे गटाचे शिवसेना विभागप्रमुख दिलीप आमले, कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक प्रभाग ८६चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी मृतांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात लेखी निवेदने सादर करूनही राज्य सरकारकडून आजतागायत उदासिनता दाखविण्यात आलेली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात २३ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री नऊ-सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास तुलसी विहार या इमारतीचे स्लॅब कोसळले. तिसऱ्या मजल्यावरील हॉलचे स्लॅब कोसळून तिसरा, दुसरा व पहिल्या मजल्यावरील स्लॅब थेट तळमजल्यावरील टेलरच्या दुकानात कोसळले. टेलरचे नशिब बलवत्तर की घटना घडण्यापूर्वीच काही मिनिटे अगोदर टेलरने दुकान बंद केले होते. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावरील रहीवाशी बाबाजी शिंगाडे (५५) व त्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर काम करणारे रामजु नाईक (५७) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत शोभा शिंगाडे (५०) आणि मजुर अजिज मुल्ला (४८) हे गंभीर जखमी झाले.
या दुर्घटनेनंतर महापालिकेने संपुर्ण इमारत खाली केली आहे.
या दुर्घटनेमधील रहीवाशांना दूर्घटना घडल्यानंतर भाजपाचे स्थानिक नेते सुरज पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा सचिव महादेव पवार व अन्य सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी अथक मदत केली. शीख धर्मियांच्या दर्शन दरबारने या इमारतीमधील रहीवाशांना निवारा व भोजनाची सोय करत मानवतेचे दर्शन घडविले. ही इमारत धोकादायक अवस्थेत असल्याने इमारतीच्या अन्य विंगही पालिकेने बंद केल्या असून रहीवाशीदेखील मिळेल त्या ठिकाणी स्थंलातरीत झाले आहेत.
दुर्घटनेतील मयत स्थानिक रहीवाशी शिंगाडे व मजुर नाईक यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रत्येकी पाच लाख रूपये देण्याची मागणी भाजपच्या स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन देवून मागणी केली. शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख दिलीप आमले यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन देताना मृतांच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत देण्याची मागणी केली. कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक प्रभाग ८६चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात लेखी निवेदन देवून मृतांना प्रत्येकी पाच लाख रूपये व जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री कार्यालयातून जीवन गव्हाणे यांचे मदतीबाबतचे निवेदन तात्काळ डॉ. सोनिया सेठ यांच्याकडे पाठविले गेले. जीवन गव्हाणे यांनी तात्काळ डॉ. सोनीया सेठ यांनाही निवेदन सादर केले. यापुढे मात्र काहीही कार्यवाही काहीही झाली नाही.
रस्त्यावर अपघात झाल्यावर राज्य सरकार तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेते. मात्र तुलसी विहारच्या दुर्घटनेबाबत राज्य सरकार अजूनही सकारात्मक प्रतिसाद घेत नसल्याची नाराजी जीवन गव्हाणे यांनी व्यक्त केली आहे.