एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सचिव हाजी शाहनवाज खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पनवेल शहरातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प वेतनाची चौकशी करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई पाठेपाठ पनवेल शहरामध्ये शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात. नवी मुंबई शहरातील मुलेही खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी येत असतात. मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी मात्र पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सुखावह चित्र नाही. खारघर, कामोठे, पनवेल, तळोजा व महापालिका कार्यक्षेत्रातील अन्य ठिकाणीही शाळांना अनुदान असतानाही शाळेतील शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आजही वेतन मिळत नाही. तुटपुंज्या वेतनात महागाईच्या काळामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आपला संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. महाराष्ट्र सरकारने पनवेल शहरातील शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या वेतनाबाबत व शाळांना मिळत असलेल्या अनुदानाबाबत स्वतंत्रपणे चौकशी होणे आवश्यक आहे. महागाईच्या काळात अनेक शाळांमध्ये आजही पाचवा वेतन आयोगानुसारही वेतन मिळत नाही. पनवेलमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत स्वतत्र विभाग लवकरात लवकर कार्यान्वित करून त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.