नवी मुंबई :नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या नरवीर तानाजी मालुसरे क्रिडांगणातील बंदीस्त गटारावरील गळून पडलेले सिमेंटचे कव्हर्स (सिमेंटचे ठोकळे) तातडीने बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा या प्रभाग ८६ मधील कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान व नरवीर तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या क्रिडांगणात पावसाळ्यात साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी उद्यान व क्रिडांगणात महापालिकेने पावसाळी गटाराचेही निर्माण केलेले आहे. या क्रिडांगणामध्ये सार्वजनिक शौचालयालगतच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर मॉर्निग वॉकच्या तसेच चालण्याच्या मार्गिकेवरून डाव्या हाताकडे वळल्यावर आपणास गेल्या काही महिन्यापासून बंदीस्त गटारावरील गळून पडलेले सिमेंटचे कव्हर्स (सिमेंटचे ठोकळे) पहावयास मिळतील. यामुळे क्रिडांगणाला दुरवस्था आली असून बकालपणाही प्राप्त झाला आहे. गटर खुले असल्याने उद्यान व क्रिडांगणात येणारे रहीवाशी त्या गटारामध्ये कचरा व खाण्याचे साहित्य टाकतात. उद्यान व क्रिडांगणालगत बसणारे फेरीवाले, खाद्यविक्रेते आपले सामानही तेथे फेकून देतात. या बंदीस्त गटारावरील सिमेंटचे कव्हर (सिमेंटचे ठोकळे) गळून पडल्याने उद्यान व क्रिडांगणातील रहीवाशांना डासांचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी मद्यपि व चरसी, गाजांडी घटक त्या ठिकाणी लघुशंकाही करताना पहावयास मिळतात. क्रिडांगणाला बकालपणा आला आहे. आपण स्वत: या ठिकाणी येवून पाहणी केल्यास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. हे गटर बंदीस्त केल्यास क्रिडांगणाची दुरवस्था व प्राप्त झालेला बकालपणा संपुष्ठात येईल, दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नाही. डासांचा त्रास कमी होईल. कोणी त्यात कचराही टाकणार नाही. आपण संबंधितांना हे गटर पुन्हा पूर्वीप्रमाणे बंदीस्त करण्याचे आदेश देवून नेरूळ सेक्टर सहाच्या रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.