नवी मुंबई : : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील उलवे परिसरात मुस्लिम धर्मियांसाठी कब्रस्तान व नमाज पढण्यासाठी मशिदीसाठी तसेच स्मशानभूमी आणि विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांसाठी भुखंड उपलब्ध करून देण्याचे सिडकोला निर्देश देण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी एका निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील उलवे नोड हा गेल्या दीड-दोन दशकांमध्ये मोठ्या वेगाने विकसित झालेला परिसर आहे. येथे नागरीकरणाचा वेगही प्रचंड आहे. उलवे परिसरात मोठ्या प्रमाणावर इमारतींचे जाळे विखुरलेले असून या परिसर पूर्णपणे सिमेंटचे जंगल बनलेला आहे. सिडकोने या परिसरात गृहनिर्माण व वाणिज्य संकुलांसाठी भुखंड उपलब्ध करून दिले. पैसा कमविला, परंतु येथे रहावयास येणाऱ्या नागरिकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देणेही सिडकोचीच जबाबदारी आहे. उलवे परिसरात स्मशानभूमी, दफनभूमीची सुविधा येथे रहावयास येणाऱ्या हिंदू-मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांना कोणाचे मयत झाल्यास खुप अडचणींचा सामना करावा लागत आहे. उलवेमधील मुस्लिम आणि ख्रिश्चन रहीवाशांना घरात अथवा नातलगांचे मयत झाल्यास नेरूळ सेक्टर चार या ठिकाणी अंत्यिवधीसाठी मृतदेह घेवून यावे लागते. हिंदू लोकांना उलवेमध्ये स्मशानभूमी उपलब्ध असली तरी ती ब्रिटीशकालीन स्मशानभूमी आहे. तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. त्यामुळे या ठिकाणी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांसाठी अंत्यविधीचे क्रियाकर्म करण्यासाठी सुविधायुक्त स्मशानभूमी, कब्रस्तान सिडकोने लवकरात लवकर उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
या ठिकाणी रहावयास येणाऱ्या सर्वधर्मियांना प्रार्थनास्थळेही उपलब्ध नाहीत. मुस्लिम बांधवांना उलव्यात मशिद नसल्याने नमाज पढण्यासाठी नेरूळमध्ये यावे लागते. तिच परिस्थिती ख्रिश्चन बांधवांचीही आहे. त्यांना चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी नेरूळ-सिवूडस या ठिकाणी यावे लागते. त्यामुळे सिडकोला आपण हिंदूंच्या मंदिरासाठी, मुस्लिमांच्या मशिदीसाठी आणि ख्रिश्चन बांधवांच्या चर्चसाठी तसेच बुद्ध धर्मियांच्या बुध्द विहारासाठी स्वतंत्ररित्या भुखंड सिडकोने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सिडकोला आता उलवे तसेचस भोवतालच्या परिसरात भुखंड विक्री करण्यास बंदी आणून लोकांच्या नागरी सुविधांना प्राधान्य देण्याचे आपण ठणकावून सांगितले पाहिजे. उलवे परिसरात वास्तव्यास येणाऱ्या आणि आलेल्या नागरिकांसाठी अंत्यविधीकरता स्मशानभूमी तसेच दफनभूमी आणि मशिद, मंदिर, चर्चसह बुध्दविहारासाठी भुखंड उपलब्ध करून देण्याचे सिडकोला तातडीने निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.