स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मोरबे धरण परिसरातील प्रतिबंधित परिसरात बेकायदेशीररित्या विनापरवानगी केलेले जलपुजनाचे कृत्य भाजपच्या अंगलट येत असून नवी मुंबईतील अतिउत्साही भाजप नेत्यांच्या जलपुजनाच्या घाईचे पडसाद भाजपच्या प्रदेश स्तरावरही उमटण्यास सुरूवात झाली आहे. कोणीही नेता याप्रकरणी उघडपणे भाष्य करत नसला तरी यामुळे कॉंग्रेसला आंदोलनाचे व जनसामान्यांत जाण्याचे आयते कोलित उपलब्ध करून दिल्याची नाराजी भाजपच्या प्रदेश वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
नेरूळ नोडमधील एका माजी चमकेश नगरसेवकांमुळे नाईक परिवाराला किंमत मोजावी लागत असल्याची माहिती भाजपमधील प्रदेश सूत्रांकडून देण्यात आली आहे. जनसंवाद कार्यक्रमातही भाजपच्या नेरूळ नोडमधील माजी नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्यांवर घेतलेले तोंडसुख महापालिका अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागले असून कॉंग्रेस व ठाकरे गटातील काही घटकांना महापालिकेतील अधिकारी भाजपच्या माजी नगरसेवकांच्या ‘विकासकामांचे कारनामे’ देवू लागल्याने भाजप येत्या काळात तोंडघशी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोरबेच्या जलपुजन कार्यक्रमातही नेरूळ नोडमधील या माजी नगरसेवकाची महत्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मोरबे धरणाच्या प्रतिबंधित परिसरात २४ सप्टेंबर २०२३ रोजी बेकायदेशीररित्या प्रवेश करून माजी खाजदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि इतर माजी नगरसेवक यांनी जलपूजन केले. याप्रकरणी पानीपुरवठा विभागाच्या संबंधित अभियंत्यांना खुलासा सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.
यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण २४ सप्टेंबरला काठोकाठ भरल्याचे प्रशासनाने रविवारी सकाळी घोषित केले. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मोरबे धरणाचे जलपूजन मंगळवारी करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या. परंतु कोणतेही पद नसताना माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह उपस्थित माजी नगरसेवक यांनी २४ सप्टेंबर २०२३ रोजी मोरबे धरण परिसरात बेकायदेशीरिरत्या तसेच महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता प्रवेश करून मोरबे धरणाचे जलपुजन केले. सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत सभागृह नाही, लोकप्रतिनिधीही कोणी नाही. प्रशासकीय राजवट असून महापालिका आयुक्त प्रशासक आहेत. वास्तविक पाहता मोरबे धरणाच्या कार्यक्षेत्रात कोणाही सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे. हा पूर्णपणे प्रतिबंधित विभाग आहे. येथे महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, महापालिका प्रशासनाला पूर्वसूचना न देता प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या मोरबे धरणाच्या परिसरात अनधिकृरीत्या प्रवेश करून जलपुजन करणारे माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह उपस्थित माजी नगरसेवक आणि इतरांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याची मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना एका निवेदनाद्वारे केली होती. या संदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालय बाहेर या संदर्भात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावर आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित सर्व अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर आल्यावर पुढची योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. भाजपची नवी मुंबईकरांमध्ये या कृत्यामुळे नाचक्की झाली असून नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी आमदार गणेश नाईकांच्या जनसंवाद कार्यक्रमात पालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि मोरबे जलपुजन प्रकरणी विनापरवानगी बेकायदेशीररित्या प्रवेश या दोन प्रकारणात भाजपची कोंडी केल्याने मुंबई स्तरावर भाजपसह कॉंग्रेसमध्ये रविंद्र सावंत हे नाव बहूचर्चित झाले आहे. जलपुजनाचे कृत्य बेकायदेशीररित्या विनापरवानगी भाजपच्या घटकांनी केले, मात्र कारणे दाखवा नोटीसचा सामना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना करावा लागल्याने भाजपच्या या कृत्याबाबत नवी मुंबईकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.