सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई – नेरुळ विभागातील सेक्टर-६ येथील तुळसी भवन या तीन मजली इमारतीमधील एका विंगच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब एकावर एक कोसळल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेत बाबासो आण्णा शिंगाडे (वय ५६ ) व रामजी चव्हाण (वय ५०) या दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे इमारतीच्या दुर्घटनेत मयत झालेल्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची तातडीने मदत जाहीर करण्याची लेखी निवेदन बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे केली होती. त्याच अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी सदर प्रस्ताव हा तयार करून मंत्रालयाकडे मंजुरी करिता पाठविला असून लवकरात लवकर नेरूळ सेक्टर-६, परिसरात झालेल्या तुलसी भवन इमारतीच्या दुर्घटनेत मयत झालेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत प्राप्त होणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच त्यापुढे म्हणाल्या की, सोसायटीतील रहिवासी व मजूर हे दोघेही घरात कमावते असल्याने त्यांच्या घराला आज आधाराची गरज आहे. इमारतीत दुर्घटना घडल्याने इमारतीमधील रहिवाशीयांना बेघर होण्याची वेळ येवू नये तसेच इमारतीची डागडूजी लवकरात लवकर व्हावी व कुठल्याची प्रकारचा विलंब न करता इमारत दुरुस्ती करून द्यावे असे त्यांनी सांगितले.
तसेच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नेरुळ विभागातील सेक्टर ६ मधील “तुळशी भवन” या इमारतीतील स्लॅब कोसळून दुदैवी मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री अर्थसहाय्य आर्थिक निधी मधून प्रत्येकी रक्कम ५ लाख रुपये आर्थिक मदत लवकरात लवकर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.