विनापरवानगी जलपुजन, बेकायदेशीर प्रवेशप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या पालिकेच्या हालचाली सुरू?
मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० % पातळी
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : यंदा पाऊस समाधानकराकरित्या पडल्याने नवी मुंबईकरांना पाण्याचा पुरवठा करणारे मोरबे धरण रविवारी मध्यरात्री १.३० वाजता पूर्ण भरले. महापालिका प्रशासनाने ही माहिती नवी मुंबईकरांसाठी प्रसिद्धही केली. मंगळवारी मोरबे जलपुजनाचे नियोजनही महापालिका प्रशासनाने केलेले असताना माजी खासदार डॉ. संजीव नाईक हे माजी आमदार सागर नाईकांसह अन्य नगरसेवकांना घेवून मोरबे स्थळी गेले व त्यांनी मोरबेचे जलपुजनही केले. हे कृत्य बेकायदेशीर असून मोरबे धरणाच्या आतील प्रशासकीय क्षेत्रातील त्यांचा प्रवेशही बेकायदेशीर आहे, महापालिकेची परवानगी न घेता हे जलपुजन केल्याने त्यांच्यावर महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी केली आहे. भाजपचे जलपुजन बेकायदेशीर असल्याचे सांगत सोशल मीडियावर कॉंग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी सोशल मीडियावर भूमिकाही दिवसभर मांडली. भाजपचे जलपुजन प्रकरण कॉंग्रेसच्या आक्रमकतेमुळे चिघळणार असल्याचे स्पष्ट होताच महापालिका प्रशासनाने जलपुजनप्रकरणी भाजपच्या उपस्थितांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण १००% भरला असून ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने रविवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजता सांडव्याचे दोन्ही दरवाजे १५ से.मी. उघडण्यात आलेले आहेत व ६७५ क्युसेक इतका विसर्ग सांडव्यातून सुरु झाला आहे.
यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत ३५४० मि.मि. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत १९०.८९० द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे. यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे मोरबे धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच आसपासच्या शहरांतील जलस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मोरबे धरण तुडूंब भरल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहिर होताच माजी खासदार, नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि भाजपचे नवी मुंबईतील नेते डॉ. संजीव नाईक यांनी 🎤माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनावणे, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, उषा भोईर यांच्यासह अन्य माजी नगरसेवक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मोरबे धरण क्षेत्रात धाव घेतली. डॉ. संजीव नाईकांच्या हस्ते मोरबेचे जलपुजनही करण्यात आले.
भाजपच्या जलपुजनावर कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी आक्षेप घेत जोरदार हल्लाबोल चढविला आहे. भाजपच्या घटकांचे मोरबे धरण क्षेत्रात प्रवेश, जलपुजन , प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या संख्येने प्रवेश बेकायदेशीर असल्याची भूमिका रविवारी दिवसभरात सोशल मीडियावर मांडत रविंद्र सावंत यांनी याप्रकरणी संबंधितांवर महापालिका प्रशासनाने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या लोकांसमवेत फिरताना कोणी अनोळखी घटकांने पाण्यात काही टाकल्यास नवी मुंबईकरांना त्याची किंमत मोजावी लागण्याची भीतीही कॉंग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. रविवारी महापालिका मुख्यालय बंद असल्यानेस सोमवारी पालिका मुख्यालयात कॉंग्रेस शिष्टमंडळासमवेत पालिका आयुक्तांची भेट घेवून संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे रविंद्र सावंत यांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर रविंद्र सावंत यांनी जोरदार हरकत घेतली होती, अशा कार्यक्रमांना महापालिका अधिकाऱ्यांना न पाठविण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी करताना त्यांनी राज्याचे तत्कालीन सचिव रत्नाकर गायकवाड यांनी काढलेले जीआरही निवेदनासोबत सावंत यांनी जोडले होते.
मोरबे धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात भाजपच्या घटकांचा विनापरवानगी शिरकाव, जलपुजन या घटनाच बेकायदेशीर असल्याने व या घटनेला भाजप-कॉंग्रेस राजकीय वादाची झालर लागण्याची निर्माण झालेली शक्यता व कॉंग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांची आक्रमक भूमिका यामुळे पालिका प्रशासनाने भाजपच्या मोरवे घटनेत उपस्थित असलेल्या सर्वांवरच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. विनापरवानगी बेकायदेशीररित्या मोरबे धरण प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश व विनापरवानगी जलपुजन हे प्रकरण भाजपच्या संबंधितांवर चांगलेच शेकणार असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू झाली आहे.