गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई भाजपाच्या वतीने दिघा पासून बेलापूरपर्यंत १११ प्रभागांमध्ये नवी मुंबई शहरात स्वच्छता हीच सेवा अंतर्गत भारत स्वच्छता अभियान हजारो स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सहभागाने उत्साहात पार पडले. आमदार गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये लोकप्रतिनिधी, युवक,युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था अशा सर्व घटकांचा मोठा लोकसहभाग लाभला.
शहरातील गाव गावठाण ,शहरी भाग, झोपडपट्टी, औद्योगिक परिसर, वाणिज्यिक संकुले ,रेल्वे स्थानके, सार्वजनिक परिसर ,सोसायटी, उद्याने मैदाने ,चौक अशा सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.
वाशी सेक्टर १० ए या ठिकाणी सागर किनारी स्वच्छता मोहीम पार पडली. सागरी किनारी पसरलेला कचरा स्वच्छ करण्यात आला. या परिसरात खारफुटीचे संरक्षण करणारे मॅग्रोज मार्शल संस्थेचे पर्यावरण संरक्षक कार्यकर्ते रोहित मल्होत्रा आणि त्यांचे सहकारी देखील सहभागी झाले होते.
स्वच्छतेमुळे प्रगती होते. आ. गणेश नाईक
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.गणेश नाईक यांनी संत गाडगेबाबा महाराजांपासून ते महात्मा गांधींपर्यंत सर्वांनी स्वच्छतेचे महत्व सांगितल्याचे नमूद करून ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी सकारात्मक विचारांची निर्मिती होते असे ते म्हणाले.
स्वच्छतेची सवय ३६५ दिवस जपावी – जिल्हाध्यक्ष संदीप नाईक
स्वच्छता अभियान एक दिवस नाही तर वर्षातले ३६५ दिवस स्वच्छतेची सवय जपावी, असे आवाहन नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि सुंदर भारताचे स्वप्न पाहिले. २०१४ पासून देशामध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविले जात असून त्याचे सकारात्मक परिणाम देशभरात दिसू लागले आहेत. प्रत्येकाने स्वच्छतेची सवय अंगीकारावी. आपल्यामुळे अस्वच्छता होणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून, कार्यालयापासून परिसरातून करावी, असे आवाहन केले. नवी मुंबई शहर स्वच्छतेचा पुरस्कार, स्वीकार आणि आचरण करणारे शहर असून नागरिकांनी स्वच्छतेचा विचार आणि संस्कार पुढच्या पिढीच्या मनावर बिंबवायला हवा, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिक ही समाजाची संपत्ती
राष्ट्रीय स्वच्छता अभियान सोबतच आज जेष्ठ नागरिक दिन देखील होता. यानिमित्त लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी अनुभव संपन्न ज्येष्ठ नागरिक समाजाची संपत्ती असल्याचे म्हटले. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या लोककल्याणकारी धोरणानुसार नवी मुंबईमध्ये ज्येष्ठांना प्रवासात सवलती, चार क्षण आनंदात घालवण्यासाठी विरंगुळा केंद्रांची निर्मिती अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुढच्या पिढीवर संस्कार करणाऱ्या आई-वडिलांची कुटुंबांमधून जपणूक व्हायला हवी, असेही जिल्हाध्यक्ष संदीप नाईक म्हणाले.