जय मैती : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशात ‘सेवा पंधरवडा’ अभियान राबविले जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबईतील शेतकरी शिक्षण संस्था घणसोली येथे भाजपा आमदार रमेश पाटील यांच्या उपस्थितीत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता मोहीम हा भारत सरकारचा सर्वात जलद आणि क्रांतिकारी उपक्रम असून त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रमेश पाटील यांनी स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले होते. या स्वच्छता मोहीमेमध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजातील विविध मान्यवरांनी सहभाग घेऊन स्वच्छतेची शपथ घेतली. त्याचप्रमाणे ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त आमदार रमेश पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला.
यावेळी बोलताना आमदार रमेश पाटील यांनी मानवी जीवनासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून ही स्वच्छता मोहीम पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांच्या खांद्यावर असल्याचे सांगितले. या अभियानात स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.