नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांचा मुख्यमंत्र्यांसह उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना इशारा
गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नेरूळ पूर्वेला सुसज्ज अवस्थेत असलेल्या आरटीओ कार्यालयाचे लवकरात लवकर उद्घाटन न केल्यास दसऱ्याच्या शुभमूहूर्तावर कॉंग्रेस या कार्यालयाचे प्रतिकात्मक उद्घाटन करणार असल्याचा लेखी इशारा नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह नवी मुंबई आरटीओच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांना एका निवेदनातून दिला आहे.
नवी मुंबईतील आरटीओचा कारभार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटच्या आवारामधून चालविला जात आहे. नेरूळ पूर्वेला आरटीओचे कार्यालय गेल्या काही महिन्यापासून सुसज्ज अवस्थेत उद्घाटन कधी होणार याची प्रतिक्षा करत आहे. या ठिकाणी आरटीओचे कार्यालय कार्यान्वित झाल्यास बेलापुर, सिवूडस, करावे, दारावे, नेरूळ, शिरवणे, कुकशेत, नेरूळ पूर्व आणि पश्चिम परिसर, सारसोळे, जुईनगर, शिरवणे भागातील वाहनचालकांना एपीएमसी आवारात जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना आरटीओच्या कामासाठी परिसरापासून जवळच आरटीओ कार्यालय उपलब्ध आहे. आरटीओ कार्यालय बांधून तयार असतानाही उद्घाटनासाठी विलंब करणे योग्य नाही. या आरटीओ कार्यालयाचे आपण दसऱ्याच्या आत उद्घाटन करून ते सुरू न केल्यास प्रशासनाचा उद्घाटनाबाबतचा वेळकाढूपणा सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तसेच उद्घाटनास विलंब होत असल्याने स्थानिकांचा रोष आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी या आरटीओ कार्यालयाच्या दसऱ्याच्या शुभमूहूर्तावर नवी मुंबई कॉंग्रेस पक्षाकडून प्रतिकात्मक उद्घाटन केले जाईल. यातून प्रशासनाची जी उद्घाटनास होत असलेल्या विलंबाबाबत सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा मलीन होईल, त्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासनच राहील. एकतर दसऱ्यापर्यत या कार्यालयाचे उद्घाटन व लोर्कापण करा अन्यथा दसऱ्याच्या शुभदिनी कॉंग्रेस प पक्षाकडून या कार्यालयाचे प्रतिकात्मक स्वरूपात उद्घाटन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी दिला आहे.