गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ –
नवी मुंबई : सानपाडामधील वेस्टर्न कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या रस्त्यावरील गतीरोधकालगतचे खड्डे तातडीने बुजविण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा येथे सिताराम मास्तर उद्यान, झाशीची राणी क्रिडांगण, पंजाबी लोकांचे प्रार्थनास्थळ येथून हाकेच्या अंतरावरच वेस्टर्न कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातून विद्यार्थी येतात. या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रस्ता असून तेथेच गतीरोधक आहे. या गतीरोधकाला लागूनच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे आता विस्तारत चालले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना गतीरोधकालगच्या खड्यातून वाट काढावी लागते. अनेक दुचाकी तिथे घसरून पडल्या आहे. सिताराम मास्तर उद्यानाकडून मिलेनिअम हॉस्पिटलकडे जाताना हे खड्डे गतीरोधकालगतच असल्याने पटकन निदर्शनास येत नाहीत. खड्डे चुकविताना दुचाकी घसरून पडल्या आहेत. याशिवाय अनेकांना जखमाही झाल्या आहेत. पाऊस पडल्यावर खड्ड्यात पाणी साचते,. दुचाकी, तिचाकी व चारचाकी वाहनांना खड्यांचा अंदाज येत नाही. समस्येचे गांभीर्य पाहता, महापालिकेच्या संबंधितांना तात्काळ हे खड्डे बुजविण्याचे निर्देश देवून कॉलेज विद्यार्थ्यांना व सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.