गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिवाळीचा सण १० नोव्हेंबरपासून सुरु होत असल्याने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी यादृष्टीने सन २०२२-२३ या वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना ३० हजार रुपये तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना २४ हजार रुपये आणि आशा वर्कर यांना १४ हजार रुपये रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे.
यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी – कर्मचारी यांना ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
त्याचप्रमाणे ठोक मानधनावर, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना २४ हजार रुपये इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.
याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पध्दतीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे २४ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
अशा प्रकारे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या ४५५९ अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आलेले असून त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी महाराष्ट्र कर्मचारी यूनियन (संलग्न इंटक)च्या पदाधिकारी यांनी आयुक्त यांचे पुष्प गुच्छ देऊन धन्यवाद मानले. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र कर्मचारी युनियनने कामगा नेते रविंद्र सावंत यांच्या माध्यमातून कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बोनससाठी पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला होता. शिष्टमंडळाच्या माध्यमातूनही मागणी पालिका आयुक्तांकडे केली होती. कामगार नेते रविंद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांनी कृतीतून सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे आभार मानले.