गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सीबीडी बेलापुर येथील सेक्टर ८ परिसरात भुखंड क्रमांक १३ वर उभारण्यात आलेल्या आदिवासी भवनचे उद्घाटन शनिवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते होत आहे.
बेलापुर विधानसभेच्या भाजप आमदार सौ.मंदाताई विजय म्हात्रे यांच्या आमदार निधीतून हे आदिवासी भवन साकारण्यात आलेले आहे. सौ. मंदाताई म्हात्रे यांची नगरसेविका ते तीन वेळा आमदार अशी वाटचाल झाल्याने व तळागाळातील जनतेशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क असल्याने जनसामान्यांची नस त्यांना चांगलीच परिचयाची आहे. वैद्यकीय रुग्णालय व वैद्यकीय कॉलेज उभारणीत आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंचे योगदान व राजकीय असूयेतून त्यांना झालेला विरोध यामुळे सौ. मंदाताई म्हात्रे या नवी मुंबईकरांमध्ये एक आयकॉन बनल्या आहेत. जेटीवरील सुविधा, सागरी पुलामध्ये बाधित होणाऱ्या मच्छिमार बांधवांच्या मदतीसाठी शासन दरबारी पाठपुरावा, प्रकल्पग्रस्त आगरी-कोळी समाज, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील बंद पडलेल्या अतिरिक्त भाजी मार्केटमध्ये बहूउद्देशीय व्यापारास मिळवून दिलेली परवानगी अशा विविध कामांतून आमदार मंदाताई म्हात्रे ग्रामस्थांसह कॉलनीवासियांमध्ये लोकप्रिय आहेत. कोरोना काळात गरजू लोकांना स्वत: जेवणाचे डबे पुरविताना त्यांनी नवी मुंबईकरांमध्ये त्यांची ‘अन्नपूर्णा’ ही प्रतिमा निर्माण झालेली आहे. नवी मुंबईतील आदिवासी समाजाचे अस्तित्व पाहता त्यांना कोठेतरी हक्काची वास्तू असावी याहेतूने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तसेच आमदार निधीतून या आदिवासी भवनाची निर्मिती झालेली आहे.
शनिवारी सांयकाळी ५ वाजता होणाऱ्या आदिवासी भवनच्या उद्घाटन कार्यक्रमास नवी मुंबईकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.