गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील पाणीटंचाईवर तातडीने तोडगा काढण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरातील महापालिका निर्मित पाणीटंचाईची समस्या भस्मासूराचे स्वरूप धारण करत असतानाही पालिका प्रशासन ही समस्या सोडविण्यासाठी गांभीर्याने कोणतेही प्रयत्न करत नाही. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात पहाटे-सकाळी चार तास आणि सांयकाळी-रात्री दोन तास पाणी येत असायचे. आता मागील काही दिवसांपासून तर महापालिकेचे रात्रीचे पाणीच सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात येत नाही. तसेच गेल्या वीस दिवसापासून महापालिका प्रशासनाकडून येणारे पाणी अंत्यत कमी दाबाने अगदी लघवीच्या धारेसारखे येत असल्याचे स्थानिक रहीवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना घरामध्ये पुरेसे पाणी मिळत नाही. अनेकदा चौथ्या-पाचव्या मजल्यावर पाणी चढतही नाही. कमी दाबाने पाणी येत असल्याने अनेकदा खालच्या मजल्यावरून रहीवाशांना पाणी वाहून आणावे लागते. आज तर सेक्टर सहामधील काही सोसायटीतील रहीवाशी दर्शन दरबारसमोरील व समाजमंदिरालगतच्या सार्वजनिक पाणपोयीतून पाणी घेवून जाताना पहावयास मिळाले. हे चित्र खरोखरीच महापालिका प्रशासनासाठी व नवी मुंबई शहरासाठी आणि नवी मुंबईकरांसाठी सुखावह आहे का, याचा विचार करण्याची वेळ आलेली असल्याचा संताप संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
नवी मुंबईकरांच्या मालकीचे मोरबे धरण आहे. काही दिवसापूर्वीच ते तुडूंब भरले असल्याने नवी मुंबईकरांना पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा गाजावाजा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला. परंतु नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावाच्या नशिबी पालिकानिर्मित पाणी टंचाईचा वनवास आजही कायम आहे. गेल्या काही महिन्यापासून सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचा प्रश्न पालिका दरबारी व प्रसिद्धी माध्यमांमध्ये गाजत असतानाही हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन दाखवित असलेली उदासिनता चिंतेचा विषय बनली आहे. पाण्यासाठी सारसोळेच्या ग्रामस्थांनी व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांनी जलकुंभ फोडण्याची पालिका प्रशासन वाट पाहत आहे का? गेल्या सहा महिन्याहून अधिक काळ सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील पाणीटंचाईचा प्रश्न चिघळत चालला आहे. सारसोळेचे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी पालिका प्रशासनाप्रती संतप्त झाले आहेत. घरातील महिलांना खालच्या मजल्यावर जावून पाणी वाहून आणावे लागत आहे. पाणी कमी दाबाने येत असल्याने पाणी वर चढत नाही. आज तर सार्वजनिक पाणपोयीतून पाणी नेण्याची वेळ सेक्टर सहाच्या रहीवाशांवर आलेली आहे. सुरूवातीपासून कमी दाबाचा पाणीपुरवठा, त्यानंतर पाणीपुरवठ्याच्या वेळेत झालेली कपात, नंतर रात्रीचा पाणीपुरवठा बंद आणि आता तर कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यातही घट ही परिस्थिती आहे. पालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांची आणि सारसोळे ग्रामस्थांची पाण्यासाठी का ससेहोलपट चालविली आहे, तेच समजत नाही. पाणी समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली होणे आवश्यक आहे. आपण पालिका प्रशासननिर्मित पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.