स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिवाळीचा सण सर्वत्र आपल्या आप्तस्वकीयांसोबत, घरातील सदस्यांसोबत अनेक जण साजरा करत असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मात्र ईर्शाळवाडीतील रहीवाशांसोबत साजरी करत आपल्यातील सामाजिक संवेदनेचे दर्शन इतरांना घडविले.
ईर्शाळवाडीतील कुटुंबांच्या पाठीशी पिढ्यांन पिढ्या भक्कमपणे आधारासारखा उभा असलेलाअकडोंगर गेल्या पावसाळ्यात निसर्गकोपामुळे ढासळला आणि या गावातील असंख्य कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेकांच्या डोक्यावरची मायेची सावली हरवली, अनेकांचा आधार गेला. अशा अभागी जीवांच्या आयुष्यात नवी उभारी भरण्यासाठी त्यांना आश्वस्त आधाराची किती गरज आहे, हे आज त्यांच्या सहवासात साजऱ्या केलेल्या सणाच्या उत्साहातून अनुभवले असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
इर्शाळवाडीत रविवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहत तेथील बालकांसमवेत दिवाळी सण साजरा केला. त्यांचा सोबत हितगुज करत फराळाचा आस्वाद घेतला तसेच लहानग्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या समवेत फटाकेही फोडले. सर्वांना दिवाळी निमित्त आनंदाच्या शिदोरीचे वाटप केले.
या दुर्घटनेने कुटंब छत्र हरपलेल्या बालकांचा आधार बनून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या बालकांच्या शिक्षणाचा सर्व खर्च शिवसेनेच्या आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून उचलण्यात आला आहे.
पुढची दिवाळी हक्काच्या घरात साजरी होईल
यंदाची दिवाळी जरी या नागरिकांची तात्पुरत्या निवाऱ्यात साजरी होत असली तर पुढील दिवाळी ही त्यांच्या हक्काच्या घरात साजरी होईल अशी ग्वाही यावेळी त्यांना दिली. आजची ही विशेष दिवाळी साजरी करताना ईर्शाळवाडीतील या मुलांच्या मुखावर उमटलेले आनंदाचे हास्य कायम रहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली, हीच दिवाळीने मला दिलेली भेट आहे असे मी मानतो, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.