नवी मुंबई : सानपाडा नोडमधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमध्ये सानपाडा कॉलनी, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसराचा समावेश होत आहे. सध्या सानपाडा नोडमध्ये डासाचा उद्रेक वाढीस लागला आहे. डासांच्या उद्रेक वाढल्याने साथीच्या आजाराचे रुग्ण आजही मोठ्या संख्येने आढळत आहेत. पालिका प्रशासनाकडून डास नियत्रंणासाठी धुरीकरण अभियान राबविण्यात येते. परंतु हे अभियान रस्त्यावर तसेच गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेरील भागात राबविण्यात येते. त्यामुळे धुरीकरणाच्या वेळेस डास अंतर्गत भागात येतात. धुरीकरण प्रभावी होत नसल्याने डास नियत्रंणात येत नाहीत. साथीच्या आजारावर नियत्रंण करताना पालिकेच्या प्रयत्नांना मर्यांदा पडतात. त्यामुळे डास नियत्रंणात आणण्यासाठी व साथीचे आजार संपुष्ठात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तसेच गावठाणातील अंर्तगत भागात, तसेच चाळीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.