नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ सेक्टर सहामधील सिव्ह्यू नेरूळ या उद्यानातील बकालपणा नाहीसा करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा सचिव महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सुश्रुषा रूग्णालयासमोरच तसेच सीव्ह्यू आणि नेरूळ सिव्ह्यू या सिडकोच्या सोसायटीलगतच महापालिकेचे सिव्ह्यु नेरूळ हे उद्यान आहे. महापालिकेचे नेरूळ विभाग कार्यालय या उद्यानापासून हाकेच्या अंतरावर असतानाही हे उद्यान गेल्या काही महिन्यापासून बकालपणामुळे नेरूळ नोडमध्ये प्रसिद्ध आहे. आजही या उद्यानाच्या प्रवेशद्वारालगतच आतील बाजूस कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळतात. याबाबत अनेकांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी करूनही पालिका प्रशासन कचऱ्याचे ढिगारे हटवत नाही. कचरा साठवणूकीचे केंद्रच गेल्या काही महिन्यापासून बनले आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे उद्यानाला बकालपणा आला असून शेजारच्या सोसायटीतील रहीवाशांना डासांचा यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे महादेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
उद्यानाचा नामफलकाला गेल्या काही महिन्यापासून दुरावस्था प्राप्त झालेली आहे. उद्यानाच्या नामफलकातील अक्षरेच गळून पडल्याने उद्यानाच्या नावाचा बोध होत नाही. या नामफलकाच्या दुरूस्तीबाबत वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासन उद्यानाच्या नामफलकाच्या दुरूस्तीकडे लक्ष देत नाही. उद्यानाच्या बकालपणामुळे विभागातील नागरिक उघडपणे संताप व्यक्त करत आहेत. आपण समस्येचे गांभीर्य पाहता या उद्यानातील कचऱ्याचे ढिगारे हटविण्याचे तसेच या उद्यानात कचरा साठवणूक न करण्याचे आणि उद्यानातील नामफलकाबाबत दुरूस्ती करण्याचे संबंधितांना आदेश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा द्यावा आणि परिसराला लागलेला बकालपणा संपुष्ठात आणण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.